घरविशेषमार्वे रोडवर शाळेसमोरची अवैध पार्किंग, अतिक्रमणे जीव गेल्यावरच हटणार का?

मार्वे रोडवर शाळेसमोरची अवैध पार्किंग, अतिक्रमणे जीव गेल्यावरच हटणार का?

ब्रिजेश सिंग यांनी पालिकेकडे केली तक्रार

मार्वे रोडवरील महानगरपालिका शाळेसमोरील परिसरात असलेल्या बेकायदा अतिक्रमणांच्या आणि अनधिकृत वाहन पार्किंगच्या गंभीर समस्येमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचला आहे. याठिकाणी उभ्या असलेल्या एका मिनी बसला काही दिवसांपूर्वी आग लागल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंग तसेच अतिक्रमणांमुळे विद्यार्थी, पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्यामुळे जीवाचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही अवैध पार्किंग, बेकायदा बांधकामे हटवणार की इथे काही तरी गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

याविरोधआत प्रयास फाऊंडेशनचे ब्रिजेश सिंग यांनी तक्रार केली असून या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे पालक, सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचे ब्रिजेश सिंग यांनी म्हटले आहे. या तक्रारी याआधीही करण्यात येऊनही पोलिस, पालिका अधिकारी यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

ब्रिजेश सिंग यांनी पी उत्तर विभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना पत्र लिहून त्यांनी या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, सदर परिसरात टायरची दुकाने, बेकायदा गॅरेज आणि रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे केली जाणारी वाहनांची पार्किंग अशा स्वरूपात अनेक अनधिकृत अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे पादचाऱ्यांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत असून, रस्त्याची रुंदीही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.

या समस्येबाबत यापूर्वी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनता दरबारात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतरच्या विविध बैठकांमध्येही हा विषय वारंवार मांडण्यात आला आहे. मात्र, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ११ यांनी दिलेल्या आश्वासनांनंतरही आणि पोलीस उपायुक्त तसेच आपल्या कार्यालयाकडून मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आवश्यक निर्देश देण्यात आल्यानंतरही आजपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही, ही खेदाची बाब आहे, असे ब्रिजेश सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

न्यूझीलंडमध्ये भुवनेश्वर कुमारचा स्विंग ठरणार घातक!

घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

ज्ञानेशकुमार प्रकरणावर बोलण्यास रुबिओंचा स्पष्ट नकार

एसबीआयच्या ३,८९७ ग्राहकांची माहिती डार्क वेबवर लीक

या परिस्थितीची गंभीरता २४ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या दुर्दैवी अपघातातून अधिक स्पष्ट झाली. रस्त्यावर असलेल्या असुरक्षित पार्किंगच्या परिस्थितीमुळे बसचे सामान ठेवण्याचे दार अयोग्य पद्धतीने उघडले गेले. त्या उघड्या दरवाजाला धडक बसल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी एफआयआर क्रमांक ०२७७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या घटनेतून सद्यस्थितीतील धोकादायक परिस्थितीचे गंभीर परिणाम स्पष्ट होतात.

याशिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलसह परिसरातील विविध शाळांमधील ५,००० हून अधिक विद्यार्थी दररोज या रस्त्यावरून ये-जा करतात. बेकायदा अतिक्रमणे आणि रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने यांमुळे विद्यार्थ्यांना भरधाव वाहनांची वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे त्यांच्या जीविताला सतत धोका निर्माण झाला आहे.

वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आपण तातडीने कारवाई करावी, ही मागणी असल्याचे ब्रिजेश सिंग यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या मागण्या अशा-

  • टायरची दुकाने आणि अनधिकृत गॅरेज यांसह सर्व बेकायदा अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत.
  • रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे वाहने पार्क करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
  • पादचाऱ्यांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी पदपथ आणि रस्त्यालगतचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात यावा.
  • भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी नियमित देखरेख ठेवून सातत्याने अंमलबजावणी व कारवाई करण्यात यावी.

हा विषय नागरिकांच्या सुरक्षिततेशी, विशेषतः हजारो शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित अत्यंत गंभीर बाब आहे. भविष्यात आणखी कोणतीही दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी आपण या प्रकरणात तातडीने आणि ठोस हस्तक्षेप करून आवश्यक ती कारवाई करावी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version