घरस्पोर्ट्सखेलो इंडियासाठी ३६ हजार कोटींचा निधी!

खेलो इंडियासाठी ३६ हजार कोटींचा निधी!

देशातील क्रीडा क्षेत्राचा विकास, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन आणि क्रीडा महासंघांना बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने ३६ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील भारतीय पथकाशी संवाद साधताना त्यांनी देशाच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. ‘खेलो इंडिया’ आणि ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’ (टॉप्स) यांसारख्या उपक्रमांमुळे भारताची क्रीडा व्यवस्था अधिक आधुनिक आणि पारदर्शक होत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या १२ वर्षांत भारताने क्रीडा क्षेत्रात दूरदृष्टीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मोठे बदल घडवून आणले आहेत. पूर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व मर्यादित होते; मात्र आता जागतिक स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. देशभरात एक हजारांहून अधिक ‘खेलो इंडिया केंद्रे’ स्थापन करण्यात आली असून, ग्रामीण भागातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना घडविण्यावर सरकारचा भर असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.

आशियाई स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी

जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने एकूण ८५ पदकांची कमाई करत पदकतालिकेत चौथे स्थान पटकावले. भारतीय खेळाडूंनी २१ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३७ कांस्यपदके जिंकून देशाचा गौरव वाढवला. या कामगिरीचे कौतुक करताना पंतप्रधानांनी युवा खेळाडूंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे विशेष अभिनंदन केले.

या स्पर्धेत १५ ते १७ वर्षे वयोगटातील अनेक खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली. युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचाही भारतीय संघाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीत सहभाग होता. कमी वयात मिळवलेले हे यश देशातील नव्या क्रीडा प्रतिभेचे प्रतीक असल्याचे मोदी यांनी नमूद केले. यशाच्या मार्गात वय अडथळा ठरू शकत नाही, त्यामुळे खेळाडूंमधील गुणवत्ता लहान वयातच ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिक आयोजनाचे भारताचे स्वप्न

भारत २०३० मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषविणार आहे. त्याचबरोबर २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्याचेही भारताचे उद्दिष्ट आहे. या महत्त्वाकांक्षी ध्येयाच्या पूर्ततेसाठी देशभरात प्रतिभाशोध मोहीम राबवून युवा खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जात आहे. आगामी काळात हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके जिंकतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

“प्रत्येक मैदानावर तिरंग्याचा सन्मान, प्रत्येक खेळात नवे विजेते आणि भारताच्या नावावर नवे विक्रम घडवायचे आहेत,” असा निर्धार व्यक्त करत मोदी यांनी खेळाडूंना सातत्याने मेहनत करण्याचे आवाहन केले. ‘जो खेळतो, तोच बहरतो’ या संदेशातून त्यांनी क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

भारताकडे मोठी स्वप्ने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि नव्या प्रतिभांना संधी या माध्यमांतून भारताला जागतिक क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version