बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते रणवीर शौरी यांना ई-मेलद्वारे अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात ई-मेल धारकांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्सोवा येथे वास्तव्यास असणारे अभिनेते रणवीर शौरी हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात आणि विविध विषयांवर आपली मते मांडत असतात. १२ ऑक्टोबर रोजी त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर अज्ञात व्यक्तींकडून धमकीचे ई-मेल आले.
‘राज परिहार’नावाच्या ई-मेल धारकाने अत्यंत अश्लील भाषेचा वापर करत, “सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास डोक्यात रॉड मारून संपवून टाकू” अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, “आम्हाला तुझा ठावठिकाणा माहिती असून योग्य वेळ आल्यावर हल्ला करू,” असा मजकूरही पाठवण्यात आला होता. हा ई-मेल पाठवताना आरोपीने ‘शाहीद अली’ याच्या ई-मेल आयडीवरही सीसी केला होता. त्यानंतर काही वेळातच संबंधित ई-मेल धारकांकडून पुन्हा मॉब लिंचिंगचा उल्लेख करत आणखी धमक्या पाठवण्यात आल्या.
हे ही वाचा:
गोलंदाजांनीच बुडवली भारताची नौका
सर्व्हिस रायफलसह पोलीस अधिकारी बेपत्ता
खेलो इंडियासाठी ३६ हजार कोटींचा निधी!
“होय, आम्हाला सत्तापरिवर्तन हवे आहे!”
वारंवार येणाऱ्या या धमक्यांनंतर अभिनेते रणवीर शौरी यांनी तातडीने मुंबई सायबर पोलीस ठाण्यात (उत्तर विभाग) धाव घेऊन लेखी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी राज परिहार आणि शाहीद अली यांच्या ई-मेल आयडी धारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता , २०२३ च्या कलम ३५१(३), ३५२ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, संबंधित ई-मेल आयडीचे आयपी अॅड्रेस आणि आरोपींचा माग काढण्याचे काम सायबर पोलिसांकडून वेगाने सुरू आहे.
