घरस्पोर्ट्सउस्मान ख्वाजा ‘सर्वात मोठा गद्दार’

उस्मान ख्वाजा ‘सर्वात मोठा गद्दार’

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या नव्या पुस्तकामुळे २०१८ मधील बहुचर्चित सँडपेपरगेट प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज फॅनी डिव्हिलियर्स याने ख्वाजावर जोरदार टीका करत त्याला ‘क्रिकेटमधील सर्वात मोठा गद्दार’ असे संबोधले आहे. ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकात २०१८ मध्ये केपटाऊन येथे झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणाची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती, असा दावा केला आहे.

पर्थमधील एका एफएम रेडिओशी बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला की, गेल्या ४० ते ५० वर्षांत खेळात पाहिलेला ख्वाजा हा सर्वात मोठा गद्दार असू शकतो. त्याने सहकारी खेळाडूंचा विश्वासघात केला असून संघातील आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पुन्हा बदनामी झाल्याची टीकाही त्याने केली.

ख्वाजाच्या पुस्तकानंतर ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटूंमध्ये मतभेद उघड झाले आहेत. माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ख्वाजाच्या दाव्यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत हे दावे फेटाळून लावले. मिचेल स्टार्कनेही आपल्या जुन्या भूमिकेवर ठाम राहत ख्वाजाच्या दाव्यांशी असहमती दर्शवली.

दरम्यान, सँडपेपरगेट प्रकरणातील प्रमुख खेळाडू कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यानेही एका लेखातून महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. कमिन्स आणि संघाला या प्रकरणाची माहिती नव्हती, हा दावा खोटा असल्याचे त्याने म्हटले आहे. त्यामुळे कमिन्सच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून त्याच्यावर कर्णधारपद सोडण्याचा दबाव वाढत असल्याचे वृत्त आहे.

२०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी १२ महिन्यांची, तर कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या जुन्या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version