मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रविवारी रायपूर येथे आयपीएल २०२६ मधील ५४वा सामना खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती समोर आली आहे.
सूर्यकुमार यादव नुकतेच पिता बनले आहेत. मात्र कुटुंबात नव्या सदस्याचे आगमन झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच ते आयपीएल सामन्यासाठी रायपूरला पोहोचणार आहेत.
‘क्रिकबज’च्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव यांनी आपल्या उपलब्धतेबाबत टीम मॅनेजमेंटला माहिती दिली आहे. त्यामुळे ते लवकरच रायपूरमध्ये संघासोबत दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हार्दिक पंड्याच्या फिटनेसवरही सर्वांचे लक्ष लागले आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पंड्याने शुक्रवारी फिटनेस टेस्ट उत्तीर्ण केली आहे. आता अंतिम निर्णय मुंबई इंडियन्सचे स्पोर्ट्स मेडिसिन प्रमुख बेन लँगली आणि फिजिओ नितीन पटेल घेणार आहेत. हार्दिकने रायपूरमध्ये संघासोबत सराव केला नसला तरी संध्याकाळी तो सरावात सहभागी होण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सची यंदाची मोहीम मात्र चढ-उतारांनी भरलेली ठरली आहे. संघाने आतापर्यंत १० सामन्यांपैकी ७ सामने गमावले असून गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवल्यानंतर एमआयला सलग ४ पराभवांचा सामना करावा लागला. त्यानंतर गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळाला, पण पुन्हा सलग ३ सामने गमवावे लागले.
मात्र, मागील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सवर मात करत मुंबईने पुन्हा विजयाची लय पकडली आहे. तरीही उर्वरित चारही सामने जिंकले, तरी संघाचे एकूण १४ गुणच होतील. साधारणपणे प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी १६ गुणांची गरज असते.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्स १४ मे रोजी पंजाब किंग्सविरुद्ध धर्मशाला येथे खेळणार आहे. त्यानंतर २० मे रोजी कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध ईडन गार्डन्सवर सामना होईल. तर २४ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याने मुंबई इंडियन्सचा लीग टप्पा संपणार आहे.
