टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातले आरोपी फरार झाल्यानंतर त्यांच्या अटकेचा थरार मुंबई पोलिसांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितला. मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले की, आरोपी वेस्टर्न लाइनवरून सुरतमार्गे कोटाच्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. मुंबई पोलिसांनी तातडीने कोटा पोलिसांशी संपर्क साधून आरोपी नेमके कोणत्या रेल्वे बोगीमध्ये बसले आहेत, याचा अचूक तपशील दिला. त्यानुसार सापळा रचून कोटा जंक्शनवर गाडी येताच तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून एक मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपी फुलसिंग याच्यावर यापूर्वी वाहन चोरीचा, तर रेहानवर आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद आहे. या संपूर्ण कटामागील सूत्रधार आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असलेला थेट संबंध तपासण्यासाठी मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहे.
जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील तिन्ही आरोपींना कोटा पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आले. अटकेनंतर आरोपींमध्ये एक अल्पवयीन असल्याचा दावा राजस्थान पोलिसांनी केला होता.मात्र मुंबई पोलिसांनी हा दावा खोडून काढत सर्व आरोपी सज्ञान असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता खंडणी विरोधी पथकाकडे (AEC) सोपवण्यात आला असून, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई यांचा ताबा घेण्यासाठी निश्चित कार्यपद्धतीनुसार (SOP) कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांनी प्रसारमाध्यमाना दिली.
हे ही वाचा:
एशियन पॅरा गेम्समध्ये सौम्याला सुवर्ण
हिंदू व्यापाऱ्यांना नग्न व्हीडिओ दाखवून ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या नाझीयाला अटक
टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी आरोपींचे धागेदोरे हाती; फडणवीसांची माहिती
‘लष्कर’ संस्थापक सदस्य मोहम्मद सरवर पायऱ्यांवरून पडून गतप्राण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फुलसिंग नरेश (वय १२ वी पास, रा. सोनीपत) आणि रेहान राशिद्दीन (वय ९ वी पास, रा. सोनीपत) हे दोघे सुमारे २० दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाले होते. तर तिसरा आरोपी ऋतिक हा मुंबईचा रहिवासी असून तो रॅपिडो ड्रायव्हर म्हणून काम करतो. आरोपींनी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच ११ सप्टेंबरला गुन्ह्यासाठी बाईक खरेदी केली होती. मागच्या रविवारी टायगर श्रॉफ ज्या मैदानावर खेळत होता, तिथेही या आरोपींनी रेकी केली होती. प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी ऋतिक बाईक चालवत होता, तर फुलसिंग आणि रेहान या दोघांनी गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे.
गोळीबारानंतर तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत पळ काढण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी घटनास्थळावरून थेट अंधेरी रेल्वे स्थानक गाठले आणि गुन्ह्यात वापरलेली बाईक तिथेच सोडून दिली. तपासादरम्यान ही बाईक पोलिसांनी अंधेरी स्थानकातून जप्त केली. अंधेरीवरून लोकल ट्रेनने आरोपी बोरिवलीला पोहोचले.
बोरीवलोयेथून कॅब बुक करून आरोपींनी गुजरातचे सुरत शहर गाठले. सुरत रेल्वे स्थानकावरून त्यांनी कोटाच्या दिशेने जाणारी पुणे -जयपूर एक्सप्रेस ही ट्रेन पकडली.
