घरस्पोर्ट्सएशियन पॅरा गेम्समध्ये सौम्याला सुवर्ण

एशियन पॅरा गेम्समध्ये सौम्याला सुवर्ण

एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय पॅरा ॲथलेटिक्सपटूंनी पदकांची लय कायम राखली आहे. महिलांच्या १५०० मीटर टी१२/टी१३ अंतिम फेरीत सौम्या हिने सुवर्णपदक, तर राधा वेंकटेश हिने रौप्यपदक पटकावले. दुसरीकडे, महिलांच्या १५०० मीटर टी११ प्रकारात रक्षिता राजू हिला नियमभंगामुळे अपात्र ठरविण्यात आल्याने भारताच्या रवन्नी वलसननी हिला कांस्यपदक मिळाले.

जपानमधील नागोया येथील मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियमवर सोमवारी या स्पर्धा पार पडल्या. सौम्याने मार्गदर्शक भरत कुमार याच्या मदतीने ५ मिनिटे १२.३९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत अव्वल स्थान मिळवले. तिला ६२१ राझा गुण मिळाले. राधा वेंकटेश हिने मार्गदर्शक गोविंद सोलंकी याच्यासह ५ मिनिटे ३०.९० सेकंदांत शर्यत पूर्ण केली. तिला ४२१ गुणांसह रौप्यपदक मिळाले.

जपानच्या माना सासाकी हिने कांस्यपदक पटकावले. तिने ५ मिनिटे १२.१५ सेकंदांची वेळ नोंदवली; मात्र राझा गुणपद्धतीनुसार तिला ३३६ गुण मिळाले. त्यामुळे तिला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

राझा गुणपद्धतीनुसार पदकांचा निर्णय

वेगवेगळ्या दिव्यांगत्व श्रेणींतील खेळाडूंच्या कामगिरीची निष्पक्ष तुलना करता यावी, यासाठी राझा गुणपद्धतीचा वापर केला जातो. या गणितीय पद्धतीनुसार खेळाडूंच्या वेळेऐवजी मिळालेल्या गुणांना महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष वेळ कमी असूनही गुणांच्या आधारे पदकांचा क्रम ठरू शकतो.

नियमभंगामुळे रक्षिता अपात्र

महिलांच्या १५०० मीटर टी११ स्पर्धेत भारताच्या रक्षिता राजू हिने मार्गदर्शक तबरेज खान याच्यासह ५ मिनिटे ३१.४५ सेकंदांत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान मिळवले होते. मात्र, टीआर ६.९ या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे तिला अपात्र ठरविण्यात आले.

या निर्णयानंतर चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या रवन्नी वलसननी हिला तिसऱ्या स्थानावर बढती देण्यात आली. रवन्नीने मार्गदर्शक राहुल बालकृष्ण याच्यासह ५ मिनिटे ४१.८५ सेकंदांत शर्यत पूर्ण केली होती. त्यामुळे तिला कांस्यपदक बहाल करण्यात आले.

टीआर ६.९ हा नियम स्पर्धेतील गणवेश, बूट आणि छातीवरील ओळख क्रमांक (बिब) यांसारख्या आवश्यक बाबींच्या नियमपालनाशी संबंधित आहे.

या स्पर्धेत चीनच्या हे शानशान हिने ४ मिनिटे ४१.१९ सेकंदांत शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक जिंकले, तर तिची सहकारी हुआंग झेंगली हिने ४ मिनिटे ५५.५४ सेकंदांच्या वेळेसह रौप्यपदक मिळवले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version