एशियन पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंनी पदकांची लय कायम राखत भालाफेकीत दुहेरी यश संपादन केले. पुरुषांच्या एफ४६ भालाफेक स्पर्धेत रिंकू याने सुवर्णपदक, तर अजित सिंह याने रौप्यपदक पटकावले. दोन्ही भारतीय खेळाडूंनी स्पर्धेतील पहिले दोन क्रमांक मिळवत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
रिंकूने ६५.११ मीटरची सर्वोत्तम फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. अजित सिंह यानेही दमदार कामगिरी करत ६५.०२ मीटरची फेक नोंदवली आणि रौप्यपदक जिंकले. दोघांमधील अंतर अवघे ०.०९ मीटर होते. इंडोनेशियाच्या सक्त्योनो आर. याने ५५.३० मीटरची फेक करत कांस्यपदक मिळवले.
कोकिलाला रौप्यपदकावर समाधान
दरम्यान, महिलांच्या गटात भारताच्या कोकिला हिला पराभवाचा सामना करावा लागला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या कोकिलाला किर्गिस्तानच्या ऐबिके उलानबेक किझी हिने पराभूत केले. ऐबिके ही २०२६ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेती, तसेच २०२५ च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची सुवर्णपदक विजेती आहे.
कोकिलाला अवघ्या २१ सेकंदांत इप्पोनद्वारे पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यापूर्वी तिने २०२२ च्या एशियन पॅरा गेम्समध्ये महिलांच्या जे२-४८ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले होते. लॉस एंजेलिस २०२८ पॅरालिम्पिकच्या स्पर्धाचक्रासाठी वजनी गटांमध्ये बदल करण्यात आल्याने कोकिला आता ५२ किलो वजनी गटात सहभागी होते.
सौम्या, राधाचेही पदकविजयी यश
सोमवारी भारतीय पॅरा ॲथलेटिक्सपटूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. महिलांच्या १५०० मीटर टी१२/टी१३ अंतिम फेरीत सौम्या हिने सुवर्णपदक, तर राधा वेंकटेश हिने रौप्यपदक पटकावले.
मार्गदर्शक भरत कुमार याच्या मदतीने सौम्याने ५ मिनिटे १२.३९ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. तिला ६२१ राझा गुण मिळाले. राधा वेंकटेश हिने मार्गदर्शक गोविंद सोलंकी याच्यासह ५ मिनिटे ३०.९० सेकंदांत शर्यत पूर्ण करत ४२१ गुणांसह रौप्यपदक मिळवले. जपानच्या
