मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठावर मोठ्या संख्येने मतदार ओळखपत्रे आढळल्याने वाद निर्माण झाला आहे. मंडलेश्वर येथील घाटावर ही ओळखपत्रे सापडली असून, त्यापैकी बहुतांश कार्डे इंदूरमधील राऊ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने ओळखपत्रे जप्त केली असून, ती नदीकिनारी कशी पोहोचली, याचा तपास सुरू केला आहे.
खरगोन जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडलेश्वर येथील घाटावर ही ओळखपत्रे आढळली. नदीकिनारी विखुरलेल्या मतदार ओळखपत्रांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत ओळखपत्रे गोळा केली आणि जप्तीची अधिकृत नोंद केली. मात्र, ही कार्डे नेमकी किती आहेत आणि ती तेथे कोणी आणली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हे ही वाचा:
वृक्षतोडीचे ‘फेक नरेटिव्ह’ पसरवून क्लीन एनर्जी रोखू नका!
टेरर फंडिंगप्रकरणी काश्मीरमध्ये चार महिलांसह सहा जणांना अटक
दहिसरमध्ये १३ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण; पोक्सोअंतर्गत तरुणाला अटक
‘स्टारलिंक’ ठरतेय युद्धातील निर्णायक कडी!
महेश्वरच्या उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) पूर्वा मंडलोई यांनी मतदार ओळखपत्रे सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तहसीलदारांना पाठवण्यात आले असून, तपासानंतर अधिक माहिती समोर येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंडलेश्वरच्या पोलीस अधिकारी श्वेता शुक्ला यांच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी निस्वार्थ सेवा समितीचे सदस्य नर्मदा घाटाची स्वच्छता करत असताना त्यांना ही मतदार ओळखपत्रे आढळली. त्यानंतर महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांना लेखी तक्रारही प्राप्त झाली असून, तिच्या आधारे तपास सुरू आहे.
