भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना क्राइस्टचर्चच्या हेगली ओव्हल मैदानावर रंगणार आहे. वेलिंग्टन येथे झालेला पहिला सामना अनिर्णित राहिल्याने मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. मात्र, या मैदानावरील भारताचा जुना इतिहास पाहता शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे.
भारतीय संघाने हेगली ओव्हलवर आतापर्यंत केवळ एकच कसोटी सामना खेळला असून, त्यात भारताला सात विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. २०२० मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत गुंडाळला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सात धावांची आघाडी मिळाली होती.
मात्र, दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर फार काळ टिकता आले नाही. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या १२४ धावांत गारद झाला. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी १३२ धावांचे लक्ष्य होते. यजमान संघाने अवघ्या तीन विकेट्स गमावत हे लक्ष्य गाठले आणि तिसऱ्याच दिवशी सामना जिंकला.
यंदा मात्र भारतीय संघाला त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्याची संधी आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
हेगली ओव्हलवरील न्यूझीलंडचा विक्रमही लक्षवेधी आहे. या मैदानावर यजमान संघाने आतापर्यंत १५ कसोटी सामने खेळले असून, त्यापैकी नऊ सामन्यांत विजय मिळवला आहे. चार सामन्यांत न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
दरम्यान, मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी केली होती. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतकी खेळी साकारली, तर यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि कर्णधार शुभमन गिल यांनी अर्धशतके झळकावली होती. भारतीय संघाने पहिल्या डावात तब्बल ७२० धावा उभारल्या होत्या. न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारताची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
मात्र, दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अखेरच्या दोन सत्रांत भारतीय गोलंदाजांना केवळ एकच विकेट मिळवता आली. त्याचा फायदा घेत न्यूझीलंडने सामना अनिर्णित राखला. आता हेगली ओव्हलवर भारतीय फलंदाजांची लय कायम राहते का आणि गोलंदाज २०२०च्या पराभवाचा वचपा काढतात का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
