घरबिजनेससौदी अरेबियातील तेल प्रकल्पावरील हल्ल्याने तेलाच्या दरात उसळी

सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावरील हल्ल्याने तेलाच्या दरात उसळी

तीन दिवसांत दर ५ डॉलरने वाढले

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली आहे. अवघ्या तीन दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल ४ ते ५ डॉलरची वाढ झाल्याने तेल आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूडचे दर ८८ डॉलरवरून थेट ९४ ते ९५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि तेलपुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींना तेजी मिळत आहे. याचा परिणाम आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतींसह जागतिक महागाईवरही होण्याची शक्यता आहे.

या दरवाढीमागे सौदी अरेबियातील तेल प्रकल्पावर झालेला हल्ला हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदी अरेबियातील रास तनुरा तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. हा प्रकल्प जागतिक तेलपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने या हल्ल्यामुळे तेल उत्पादन आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षात तेलपुरवठा विस्कळीत होण्यापूर्वीच भविष्यात टंचाई निर्माण होण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी वाढवली आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

दरम्यान, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था गोल्डमन सॅक्सने कच्च्या तेलाच्या दरांबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक तेल उत्पादनात दररोज ३५ लाख बॅरलची घट कायम राहिल्यास २०२७ मध्ये ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १४० डॉलरपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा अंदाज प्रतिकूल परिस्थितीवर आधारित असून, तेल उत्पादक देशांचे उत्पादन, जागतिक मागणी आणि पश्चिम आशियातील संघर्षाची तीव्रता यावर प्रत्यक्ष दर अवलंबून असतील.

भारतासाठी ही परिस्थिती विशेष चिंताजनक आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आयातीतून भागवतो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरवाढीचा थेट परिणाम देशाच्या आयात खर्चावर, चालू खात्यातील तुटीवर आणि रुपयाच्या मूल्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर इंधन महागल्यास वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढून सर्वसामान्यांच्या खिशावर महागाईचा भार पडू शकतो. त्यामुळे आगामी काळात पश्चिम आशियातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतींकडे भारताला बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version