आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांना दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचा दिलेला आदेश रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तिघांच्याही याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे या प्रकरणातील खटल्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ‘सर्व याचिका फेटाळण्यात येत असून, आरोप निश्चितीचा आदेश कायम ठेवण्यात येत आहे,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणातील अन्य आरोपींनी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
ऑक्टोबर २०२५ मध्ये राऊस एव्हेन्यू न्यायालयाने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव यांच्यासह ११ जणांविरोधात आरोप निश्चित केले होते. लालू यादव यांच्याविरोधात भ्रष्टाचार, फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित करण्यात आले होते. तर राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्याविरोधात फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचे आरोप निश्चित करण्यात आले होते.
सीबीआयच्या आरोपानुसार, २००४ ते २००९ या काळात लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील आयआरसीटीसीच्या दोन हॉटेल्सच्या संचालनाचे कंत्राट देताना निविदा प्रक्रियेत फेरफार करण्यात आला. हे कंत्राट सुजाता हॉटेल्स या खासगी कंपनीला देण्यात आले. त्याबदल्यात लालू यादव यांच्या कुटुंबाशी संबंधित कंपनीला बाजारभावापेक्षा कमी किमतीत कोट्यवधी रुपयांची जमीन हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
हे ही वाचा:
२६/११ च्या हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
संविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल
तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!
पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!
दरम्यान, यादव कुटुंबीयांनी तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपल्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा दावा केला होता. तसेच हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिका फेटाळल्याने त्यांना मोठा झटका बसला आहे. या प्रकरणातील सविस्तर निकालाची प्रतीक्षा आहे.
