घरराजकारणसंविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल

संविधानाचा गळा घोटणारेच लाल पुस्तकाच्या नावाने करतायत जनतेची दिशाभूल

योगी आदित्यनाथ यांचा काँग्रेसवर निशाणा

संधी मिळाली तेव्हा संविधानाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला, तेच आज लाल पुस्तक हातात घेऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेससह विरोधकांवर केली. संविधानाचे सार्वभौमत्व कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा जातीमध्ये नसून सामान्य नागरिकांमध्ये आहे, असे ते म्हणाले. संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

भारताचे संविधान १४५ कोटी नागरिकांचा अभिमान आणि मार्गदर्शक असल्याचे योगी आदित्यनाथ म्हणाले. संविधान लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेतील ‘आम्ही भारताचे लोक’ हे शब्द देशाचे सार्वभौमत्व सामान्य नागरिकांमध्ये असल्याचे स्पष्ट करतात, असे त्यांनी नमूद केले.

काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न दिले नाही आणि त्यांना संसदेत पोहोचण्यापासून रोखण्यासाठी कटकारस्थाने केली, असा आरोप त्यांनी केला. समाजवादी पक्षाच्या सरकारने कन्नौज वैद्यकीय महाविद्यालयातून बाबासाहेबांचे नाव हटवले होते; मात्र सध्याच्या सरकारने ते पुन्हा बहाल केले, असेही ते म्हणाले. मागील सरकारांनी माफिया आणि गुन्हेगारांना संरक्षण दिले, पेपरफुटी, नोकऱ्यांसाठी वसुली आणि गरीबांना योजनांपासून वंचित ठेवण्याचे प्रकार केले, अशी टीकाही त्यांनी केली.

हे ही वाचा:

तिजोरीत खडखडाट, तरी चर्चना ख्रिसमससाठी ३० हजार!

पाकिस्तानी कंटेंट भारतात दाखवू नका!

महापौर रितू तावडेंसह आयुक्त अश्विनी भिडेंना धमकीचा मेल

पासपोर्टमधील त्रुटींप्रकरणी सौरव दास विरोधात लूकआऊट सर्क्युलर

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर संविधानविरोधी असल्याचा आरोप केला. तर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी अनेक पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करतात; मात्र त्यांच्या विचारांचे पालन करत नाहीत, असे म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांशी संबंधित पंचतीर्थांचा विकास केल्याचे त्यांनी सांगितले. वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी आणीबाणीचा उल्लेख करत काँग्रेसने प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणल्याची टीका केली. समाजकल्याण मंत्री असीम अरुण यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यांची ठिकाणे ‘आंबेडकर तीर्थ’ म्हणून विकसित करण्यात येत असून, महापुरुषांच्या स्मारकांच्या जतनासोबत गावांमध्ये डिजिटल ग्रंथालये उभारण्याची योजनाही राबवली जात असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version