इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सला तीन वेळा विजेतेपद मिळवून देणारे संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत जयवर्धने यांच्या प्रशिक्षकपद सोडण्याच्या निर्णयाला दुजोरा दिला. ‘नेहमीच आमच्या एमआय पलटनचा भाग राहाल. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद, महेला जयवर्धने,’ अशा शब्दांत फ्रँचायझीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून जयवर्धने यांची ओळख आहे. संघाने आतापर्यंत जिंकलेल्या पाचपैकी तीन आयपीएल विजेतेपदे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवली आहेत. २०१७ मध्ये पहिल्यांदा मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईला विजेतेपद मिळवून दिले. २०२२ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले.
त्यानंतर २०२२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी मुंबई इंडियन्सचे ‘ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स’ म्हणून काम पाहिले. या भूमिकेत त्यांनी एमआय एमिरेट्स, एमआय न्यूयॉर्क आणि एमआय केपटाऊन या फ्रँचायझींच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. २०२५ मध्ये त्यांनी पुन्हा मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली.
मात्र, गेल्या दोन हंगामांत मुंबई इंडियन्सला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. २०२५ च्या आयपीएलमध्ये संघाला चौथ्या, तर २०२६ मध्ये नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यामुळे संघाच्या प्रशिक्षकवर्गात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आता जयवर्धने यांनी पद सोडल्यानंतर मुंबई इंडियन्स नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे.
पद सोडल्यानंतर जयवर्धने यांनी मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास आपल्या कारकिर्दीतील खास अनुभव असल्याचे सांगितले. खेळाडू, प्रशिक्षकवर्ग, संघाच्या ‘वन फॅमिली’चा पाठिंबा आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे हा प्रवास कायम स्मरणात राहील, असे त्यांनी नमूद केले. या काळात अनेक संस्मरणीय क्षण अनुभवले, आव्हानांचा सामना केला आणि अभिमान वाटावा असे यश मिळवले, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे त्यांनी विश्वास, पाठिंबा आणि मैत्रीसाठी मनापासून आभार मानले. संघासाठी आपल्या मनात कायम विशेष स्थान राहील, असे सांगत त्यांनी मुंबई इंडियन्सला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
