मोटारसायकल रेसिंगप्रेमींसाठी चेन्नईत वेगाचा थरार अनुभवायला मिळणार आहे. एमआरएफ इंडियन नॅशनल रेसिंग चॅलेंज २डब्ल्यू २०२६ स्पर्धेचा तिसरा टप्पा ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर रंगणार आहे. या स्पर्धेत देशभरातील सुमारे १३० रायडर्स सहभागी होणार असून, तीन दिवसांत एकूण १८ शर्यती पार पडतील.
मद्रास मोटर स्पोर्ट्स क्लबच्या आयोजनाखाली होणाऱ्या या स्पर्धेत सहा आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा चुरस पाहायला मिळणार आहे. सुरुवातीच्या दोन टप्प्यांतील कामगिरीनंतर विविध गटांमध्ये विजेतेपदासाठीची स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे. विशेष म्हणजे, युवा रायडर्सनी अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली आहे.
प्रीमियर सुपर स्पोर्ट ३०१-४०० सीसी गटात पुण्याचा सार्थक चव्हाण आघाडीवर आहे. त्याने चार शर्यतींपैकी तीन शर्यती जिंकल्या आहेत. चेन्नईचा रक्षित दवे आणि बंगळुरूचा चिरंथ विश्वनाथ अनुक्रमे पुढील स्थानांवर आहेत.
मात्र, दुखापतीमुळे हैदराबादचा राहिल पिल्लारीसेट्टी या टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाही. दुसऱ्या टप्प्यातील अपघातात त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्याच्या जागी चेन्नईचा १६ वर्षीय कबीलेश रजनी कृष्णन सहभागी होणार आहे. तो ११ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या रजनी कृष्णन यांचा मुलगा आहे. सुपर स्टॉक ३०१-४०० सीसी गटात कबीलेशने पहिल्या दोन टप्प्यांत तीन शर्यती जिंकून आपली छाप पाडली आहे.
महिला रायडर्सचाही दमदार ठसा
महिला रायडर्समध्ये चेन्नईची एन. जेनिफर हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोटुल स्पार्क्स रेसिंगकडून खेळताना तिने सुपर स्टॉक १६५ सीसी इंटरमिजिएट गटातील चारही शर्यती जिंकल्या आहेत. पुरुष रायडर्सशी स्पर्धा करत तिने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रो-स्टॉक २०० सीसीसह अन्य गटांमध्येही चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत. पेट्रोनास वन-मेक चॅम्पियनशिपमध्ये एक्स्पर्ट, रुकी आणि महिला असे तीन गट असतील. या स्पर्धेत हैदराबादचा राजेंद्र बीदानी आणि चेन्नईचा कमल नवास यांनी एक्स्पर्ट गटात प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. रुकी गटात बंगळुरूचा १६ वर्षीय देव अगस्त्य आणि तेलंगणातील मंचेरियलचा विग्नेश पोथू यांनी प्रत्येकी दोन शर्यती जिंकल्या आहेत. महिला गटात बंगळुरूची पूजिता अनिल कुमार आघाडीवर असून, तिने आतापर्यंतच्या दोन्ही शर्यती जिंकल्या आहेत.
स्पर्धेचे अध्यक्ष आणि रेस डायरेक्टर मनोज दलाल यांनी रायडर्समधील चुरस आणि नवोदितांमधील गुणवत्ता अधोरेखित केली. सर्व गटांमध्ये दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळत असून, यंदाचा तिसरा टप्पा रोमांचक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
