घरस्पोर्ट्सनेमार खेळणार की बूट टांगणार?

नेमार खेळणार की बूट टांगणार?

ब्राझीलच्या फुटबॉल संघाचे विश्वचषक २०२६ मधील आव्हान संपुष्टात आल्यानंतर स्टार फुटबॉलपटू नेमारने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. आता त्याच्या क्लब कारकिर्दीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ब्राझीलमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, त्याचा बालपणीचा क्लब सँटोसने नेमारला भविष्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी काही दिवसांची मुदत दिली आहे.

३४ वर्षीय नेमारचा सँटोससोबतचा करार अजून सहा महिन्यांसाठी शिल्लक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीनंतर तो क्लब फुटबॉलही सोडणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सुट्टीनंतर सँटोस व्यवस्थापन नेमार आणि त्याच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहे.

सध्या नेमार अमेरिकेत कुटुंबासोबत वेळ घालवत असून त्याला किमान १० दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. नॉर्वेविरुद्ध २-१ अशा पराभवानंतर त्याने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली होती. या पराभवासह ब्राझीलचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले.

निवृत्ती जाहीर करताना नेमार म्हणाला, “मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न केले. आता हा प्रवास इथेच संपतो.”

दरम्यान, नेमारच्या वडिलांनी सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत मुलाला क्लब फुटबॉल सुरू ठेवण्याचे आवाहन केले. “एक वडील म्हणून माझी एकच इच्छा आहे—नेमार, फुटबॉल खेळत राहा. पुन्हा एकदा मैदानावर हसताना तुला पाहायचं आहे,” असे त्यांनी म्हटले.

जानेवारी २०२५ मध्ये सँटोसमध्ये पुनरागमन केलेल्या नेमारने आतापर्यंत सर्व स्पर्धांमध्ये ४३ सामने खेळले आहेत. आता तो क्लब फुटबॉल सुरू ठेवणार की निवृत्तीची घोषणा करणार, याकडे संपूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version