आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध भारताने नोंदवलेल्या ९५ धावांच्या दणदणीत विजयात विकेटकीपर-फलंदाज ऋचा घोष हिने फलंदाजीसोबतच यष्टिरक्षणातही चमकदार कामगिरी केली. तिच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाची दखल घेत तिला सामन्यानंतर ‘इम्पॅक्ट फील्डर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
ऋचाने फलंदाजीत अवघ्या ८ चेंडूंमध्ये २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने नाबाद २० धावांची झंझावाती खेळी केली. त्यानंतर यष्टिमागे उभे राहत तिने बॅबेट डी लीडे आणि सिल्व्हर सीगर्स यांना स्टंपिंगद्वारे बाद केले, तर मिर्थे व्हॅन डेन राड हिचा झेलही टिपला.
बीसीसीआयने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मुनीश बाली यांनी संघाच्या एकूण क्षेत्ररक्षणाचे कौतुक करताना ऋचाच्या कामगिरीचा विशेष उल्लेख केला. सलग दुसरा विजय मिळवल्याबद्दल संघाचे अभिनंदन करत त्यांनी, “ऋचाने दोन स्टंपिंग आणि एक झेल घेतला. विशेषतः नंदिनी शर्माच्या गोलंदाजीवर केलेले स्टंपिंग अप्रतिम होते. वेगवान गोलंदाजासमोर उभे राहून बाऊन्सरवर स्टंपिंग करणे ही अत्यंत कौशल्याची बाब आहे,” असे सांगितले.
भारतीय संघाचे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक निकोलस ली यांनी अनोख्या पद्धतीने ऋचाला क्षेत्ररक्षण पदक प्रदान केले. “काही महिन्यांपासून मैदानावर आणि मैदानाबाहेर ऋचाने घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. आतापर्यंत तिच्या फलंदाजीची चर्चा होत होती, पण आता तिच्या उत्कृष्ट यष्टिरक्षणाचाही सर्वत्र गौरव होत आहे,” असे ली यांनी म्हटले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मंधाना (७४) आणि शेफाली वर्मा (५५) यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर ५ बाद २०९ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा डाव १७.३ षटकांत ११४ धावांत आटोपला.
भारताकडून श्री चरणी हिने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर शेफाली वर्माने ३ आणि नंदिनी शर्माने २ बळी मिळवले. सलग दोन विजयांसह भारताने गट-अ मधील गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून २१ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक साधण्याचे लक्ष्य असेल.
