आयपीएलच्या मैदानात पुन्हा एकदा रोहित शर्मा पर्वाची सुरुवात होण्याचे संकेत मिळाले आहेत. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने आगामी २०२७ हंगामासाठी रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. शुक्रवारी फ्रँचायझीने याबाबत अधिकृत घोषणा केली. रोहितच्या पुनरागमनामुळे मुंबईच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशी पाच आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत. संघाला विजेतेपदाची सवय लावणारा आणि खेळाडूंमध्ये विजयाची मानसिकता निर्माण करणारा कर्णधार म्हणून रोहितची ओळख आहे. त्यामुळे आगामी हंगामात मुंबईला पुन्हा विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आणण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर असेल.
रोहितचे मुंबई इंडियन्सशी नाते २०११ पासूनचे आहे. २०२४ मध्ये हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर रोहितने नेतृत्वाची जबाबदारी सोडली होती. हार्दिकने २०२४ ते २०२६ या कालावधीत संघाचे नेतृत्व केले. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला त्याला पंजाब किंग्जकडे ट्रेड करण्यात आल्याने मुंबईच्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर फ्रँचायझीने पुन्हा एकदा आपल्या सर्वाधिक यशस्वी कर्णधारावर विश्वास दाखवला आहे.
रोहितने भारतीय संघाचे नेतृत्व करतानाही आपली छाप पाडली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी नेतृत्वाचा अनुभव आगामी आयपीएल हंगामात मुंबईसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात रोहितने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. मुंबई इंडियन्स हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत संघाचे नेतृत्व करणे ही नेहमीच अभिमानाची बाब असल्याचे त्याने म्हटले. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांच्यासोबत आगामी हंगामाबाबत झालेली चर्चा उत्साहवर्धक होती. संघाने एकत्रितपणे चांगला खेळ करत चाहत्यांना आनंद साजरा करण्याच्या अनेक संधी द्याव्यात, हेच आपले ध्येय असल्याचेही रोहितने स्पष्ट केले.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, अखेर फ्रँचायझीने रोहितलाच पसंती दिली. विशेष म्हणजे, संघाकडून अधिकृत उपकर्णधाराची घोषणा होण्याची शक्यता कमी असल्याचेही वृत्त आहे.
कर्णधार म्हणून रोहितची कामगिरीही प्रभावी राहिली आहे. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग टी-२० मिळून त्याने मुंबईचे १६३ सामन्यांत नेतृत्व केले. त्यापैकी ९१ सामन्यांत विजय, ६८ सामन्यांत पराभव, तर चार सामने बरोबरीत राहिले. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
मात्र, रोहितच्या नेतृत्वाखालील शेवटचे काही हंगाम अपेक्षेप्रमाणे गेले नव्हते. २०२१ आणि २०२२ मध्ये मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. २०२३ मध्ये संघ क्वालिफायर-२ पर्यंत पोहोचला; मात्र गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने अंतिम फेरीचे स्वप्न अपूर्ण राहिले.
आता २०२७ च्या हंगामात रोहितसमोर मुंबई इंडियन्सला पुन्हा विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान असेल. पाच जेतेपदांचा अनुभव, नेतृत्वाची ताकद आणि चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा या जोरावर हिटमॅन पुन्हा एकदा मुंबईला चॅम्पियन बनवणार का, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
