महाराष्ट्राचे माजी मंत्री जयंत पाटील यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ त्यांच्याच टीमने काढला आहे. मुंबईती ऍक्वा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूमिगत मेट्रो रेल्वेने जयंत पाटील यांनी प्रवास केला होता, त्याचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओमध्ये जयंत पाटील मेट्रो स्टेशनमध्ये चालताना आणि मेट्रो रेल्वेजवळ जाताना दिसतात मग ते मेट्रोत प्रवेश करतात, बसतात असे सगळे या व्हीडिओत दिसते.
हा व्हीडिओ शेअर करताना आपण कसे मेट्रो रेल्वेबाबत आग्रही होतो, आपण मंत्री असताना कसा या मेट्रोबाबतचा प्रस्ताव दिला होता. ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे अशा अर्थाची पोस्टही जयंत पाटील यांनी शेअर केली आहे. जयंत पाटील आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळा तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली होती. त्यावेळी मुंबई शहरातील वाहतुक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एलिव्हेटेड मेट्रोचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आला होता. मात्र दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक हेरिटेज वास्तूंचे जतन व्हावे, तसेच मंत्रालय, विधानभवन आणि अनेक शासकीय, खासगी कार्यालयांमुळे सतत वर्दळ असलेल्या या भागात मेट्रो भूमिगत असावी, अशी माझी आग्रही भूमिका होती. पुढे मंत्रिमंडळाने भूमिगत मेट्रोच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज या भूमिगत मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना जलद आणि सुकर होत आहे, याचे समाधान वाटले. शहराचा वारसा जपत शाश्वत विकास साधणे, हीच खरी प्रगती आहे.
जयंत पाटलांनी ही पोस्ट लिहिल्यानंतर त्याविषयी त्यांचे मेट्रोबाबतचे जुने विधान काय होते त्या पोस्टही लोक शेअर करू लागले आहेत. त्यात २०२०च्या फेब्रुवारीमध्ये जयंत पाटील म्हणाले होते की, पुण्यासोबतच महाराष्ट्रात होणारे मेट्रोचे प्रकल्प पुढील १० वर्षात पांढरे हत्ती ठरतील. त्याचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडेल. जयंत पाटील यांनी ज्या मेट्रोला पुढील काळात पांढरे हत्ती ठरण्याची भाषा वापरली आज त्याच मेट्रोतून फिरून त्याचा व्हीडिओ बनविण्याची वेळ त्यांच्यावर आली. मुळात विलासराव देशमुख असताना ज्या मेट्रो रेल्वेचा प्रस्ताव जयंत पाटील यांनी ठेवला, त्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली त्याला पांढरा हत्ती म्हणण्याची वेळ जयंत पाटील यांच्यावर का आली आणि आज त्याच पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन जयंत पाटील प्रवास का करत आहेत, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत.
खरे तर असे अनेक प्रकल्प किंवा योजना आहेत ज्या काँग्रेसच्या काळात विचाराधीन होत्या, त्यांना मंजुरी मिळाली होती किंवा ते सुरूही झाले होते, पण प्रत्यक्षात पुढील काळात ते प्रकल्प पूर्ण करण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. काँग्रेसची ही काम करण्याची पद्धतच राहिली होती. प्रकल्प आखायचे पण त्यांचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षे ठेवायचे. त्या प्रकल्पांवर बसून राहायचे. ते पूर्ण तर सोडून द्या, सुरूही होणार नाहीत अशी त्या प्रकल्पांची अवस्था होत असे. धोरणलकवा हा याच सरकारांच्या काळातील शब्द होता. मोदी सरकार आल्यानंतर प्रकल्प कोणतेही असो त्यांचे काम झटपट व्हाय़ला हवे, ते पूर्णत्वास जायला हवेत, हा निर्धार करण्यात आला. अनेक प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आणि त्यांचे लोकार्पणही मोदींच्या हस्तेच झाले. हा कामाचा वेग लोकांना आवडला. जर जयंत पाटील मंत्री असताना मेट्रोचा प्रस्ताव ठेवण्यात आला, त्याला मंजुरी मिळाली मग तेव्हाच काम का सुरू झाले नाही. का त्याला मोदी सरकार किंवा महाराष्ट्रात फडणवीस सरकार येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ते जर प्रकल्प आधीच सुरू झाले असते, पूर्णत्वास गेले असते तर आज लोकांचे दैनंदिन जीवन आधीच सुरळीत झाले असते. कदाचित तेव्हाच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मेट्रोचे उद्घाटन झाले असते, पण आज ज्या प्रकल्पाला नावे ठेवली ती नावारूपाला आल्यावर त्यांना त्यातून प्रवास करावा लागला.
हे ही वाचा:
पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ-माहीमदरम्यान मध्यरात्री जम्बो ब्लॉक
दीपथून येथे आज होणार दीपप्रज्वलन…
२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट
भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात
आज जे स्वप्न पूर्ण झाल्याचा दावा जयंत पाटील करत आहेत, ते स्वप्न केवळ काँग्रेसने पाहिले पण रोज रात्री फक्त स्वप्न बघायची आणि नंतर ती विसरायची असा शिरस्ता सुरू राहिला. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर सगळ्या मंजुऱ्या मिळाल्या, सगळे अडथळे दूर झाले आणि आज मेट्रो रेल्वे लोकांच्या सेवेत आहे. त्याबद्दल मोदी सरकार, फडणवीस सरकार यांना श्रेय देण्याची तसदी जयंत पाटील यांनी घ्यायला हवी होती. आज विविध राज्यांमध्ये मेट्रोचे जाळे विस्तारले जाते आहे, अनेक छोटी छोटी ठिकाणे मेट्रोने जोडली जात आहेत, लोकही मोठ्या संख्येने मेट्रोने प्रवास करत आहेत, हे केवळ काही वर्षांपूर्वी प्रस्ताव ठेवल्यामुळे घडलेले नाही, त्या प्रकल्पांवर गंभीरपणे काम केल्यामुळे घडले आहे.
जो प्रकल्प सहा वर्षांपूर्वी पांढरा हत्ती वाटत होता, ते आपलेच स्वप्न होते, आपलाच प्रस्ताव होता हे जयंत पाटील साफ विसरूनच गेले. आज त्याच मेट्रोमध्ये प्रवास करताना लोकांना उभे राहायलाही जागा नाही अशी स्थिती आहे. मेट्रो आल्यामुळे त्या परिसराचे मूल्यही वाढले आहे. पण तेव्हा कदाचित महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे मेट्रोसारख्या महत्त्वांकांक्षी प्रकल्पाला विरोध केला गेला. आपणच पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा करण्याची शर्यत लागली.
कारशेडचा मुद्दा काढून विनाकारण अडथळे आणले गेले. पर्यावरणाच्या मुद्द्यावर त्या प्रकल्पात खोडा घालण्याचे काम केले गेले. ते केले नसते तर कित्येक कोटी रुपये वाचले असते. विलंब झाल्यामुळे कित्येक कोटींचा फटका प्रकल्पाला बसला. तेव्हा आपणच ठेवलेल्या मेट्रोच्या या प्रस्तावाला विरोध करू नका, हे जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे या नावाखाली राजकारण केले गेले. आज तेच सगळे लोक मेट्रोनेच प्रवास करत आहेत, मेट्रोमुळे पर्यावरणाची हानी होतेय म्हणणाऱ्यांना मेट्रोचा प्रवास आवडू लागला आहे. ते व्हीडिओ शेअर करू लागले आहेत. याच उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात मेट्रो वूमन असलेल्या अश्विनी भिडे यांची बदली करण्यात आली होती हे आठवत असेल. आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका महिला आयएएस अधिकाऱ्याची बदली केल्यामुळे नेमका काय फायदा झाला, हेही जयंत पाटील यांनी सांगायला हवे.
ऍक्वा लाइन हा भूमीगत मेट्रोचा प्रयोग सुरू होऊन बरेच दिवस लोटले, आज जयंत पाटील यांना या मेट्रोचे महत्त्व का पटले आहे, हे कळायला मार्ग नाही. कदाचित दिवसेंदिवस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची एनडीएसोबत जवळीक वाढू लागल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर जयंत पाटलांची एनडीए सरकारने पूर्ण केलेल्या प्रकल्पांशीही जवळीक वाढू लागलीय की काय? असा प्रश्नही लोकांच्या मनात आल्यावाचून राहात नाही.
एकेकाळी लोक यूपीआय वापरणार नाहीत. गरिबांकडे कुठला आलाय मोबाईल फोन. ते डिजिटल माध्यमातून कसे काय पैशांचे व्यवहार करणार असा सवाल अर्थमंत्री म्हणून काम केलेले चिदंबरम उपस्थित करत असत. पण आज गरीबातला गरीब माणूसही यूपीआय व्यवहार करतो. स्कॅन कोड वापरून पैशांची देवाणघेवाण करतो. खिशात रोख रक्कम नसली तरी व्यवहार करणे शक्य झालेले आहे. याचे कारण हे आहे की, काँग्रेसकडे दूरदृष्टी नव्हती. आपण जे प्रकल्प आणू त्याचे पुढे काय होणार, ते लोकोपयोगी कसे ठऱणार याचा कोणताही आराखडा त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे प्रकल्पांचे प्रस्ताव आले पण ते कधी प्रत्यक्ष जमिनीवर आले नाहीत. आपण पाहिलेल्या स्वप्नांचे पांढरे हत्ती होतील, अशी स्वतःलाच भीती असल्यामुळे किंवा तसा विश्वास असल्यामुळे त्या प्रकल्पात कधी तत्कालिन काँग्रेस सरकारांनी हातच घातला नाही.
शेवटी सगळा नियतीचा खेळ असतो. ज्या नरेंद्र मोदींना झिडकारण्याचा प्रयत्न, अपमानित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, त्यांना देशाच्या जनतेने तीनवेळा पंतप्रधान केले. त्याच पद्धतीने ज्या मेट्रो रेल्वेला पांढरे हत्ती ठरवण्यापर्यंत विरोध करण्याची मानसिकता होती, त्याच मेट्रोने आज प्रवास करण्याची आणि त्या मेट्रोचे गुणगान करण्याची वेळ जयंत पाटलांवर आली. आज सगळी रेल्वे स्टेशन्स सुशोभित होत आहेत, नवनवे मार्ग, नवनव्या ट्रेन्स सुरू केल्या जात आहेत. जिथे कधी विमानतळ येण्याची सुतराम शक्यता नव्हती त्या शहरात विमानतळ उभे राहू लागलेत. विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. रेल्वेतून धक्के खात जाणारा माणूस आता मेट्रोच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करू लागला आहे. लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक असते, तो बदल आता होत आहे. उभारलेल्या वास्तू, प्रकल्प हे पांढरे हत्ती होतील ही भीती दाखवणे हे आव्हानांसमोर पांढरे निशाण फडकावण्यासारखे असते. गरीबी हटावच्या घोषणा इंदिरा गांधींच्या काळात दिल्या गेल्या, विचार चांगलाच होता, पण त्यानंतर अनेक वर्षे काँग्रेसची सरकारे असूनही गरिबी हटली नाही. आता देशातील ५० कोटी लोक गरिबी रेषेतून वर आले आहेत, हे प्रयत्नपूर्वक करण्यात आले आहे. या देशाचे काय होणार, ही मानसिकता बदलून या देशाचे भले होणार ही मानसिकता अंगी बाणवणे आवश्यक आहे.
