तामिळनाडूमधील थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील वादग्रस्त दीपथून येथे आज पारंपरिक कार्तिगाई दीपम प्रज्वलित होणार आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारला चांगलेच खडसावले असून, न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना अवमानाची नोटीस बजावली आहे. मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मदुराईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाने स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारलाच न्यायालयाने जाब विचारल्याने या प्रकरणाला आता महत्त्वाचे कायदेशीर वळण मिळाले आहे.
या वादाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानंतर झाली. थिरुपरनकुंद्रम टेकडीवरील दीपथून येथे कार्तिगाई दीपम उत्सवादरम्यान पारंपरिक दिवा प्रज्वलित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी प्रशासनाने या आदेशानुसार दीपथून येथे दिवा लावण्याऐवजी उची पिल्लयार मंदिराजवळील पारंपरिक दीपमंडपात दिवा प्रज्वलित केला. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. राज्य सरकारने यापूर्वी मंदिर प्रशासनावर जबाबदारी टाकत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, या स्पष्टीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.
हे ही वाचा:
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!
अमेरिकेच्या टॅरिफचे आव्हान झुगारत भारताची १ ट्रिलियन डॉलर निर्यातीची झेप!
अमेरिकेच्या शुल्क कपातीने निर्यातदारांची चिंता कायम
महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या विश्वस्त मंडळाला निलंबित करून मंदिराच्या व्यवस्थापनासाठी मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती वैद्यनाथन आणि पार्थिबन यांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, तामिळनाडू पोलिसांना आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याचे नमूद करत संपूर्ण टेकडी आणि मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) सोपवली आहे.
न्यायालयाने शनिवारी दीपथून येथे दर्ग्यापासून किमान ५० मीटर अंतर राखून दिवा प्रज्वलित करण्यास भाविकांना परवानगी दिली आहे. मंदिर आणि दर्गा या दोन्ही ठिकाणी शांतता राखण्याची जबाबदारी सीआरपीएफवर असेल. संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवसांत अवमान नोटीस बजावून त्याबाबत वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे तामिळनाडूमधील हा धार्मिक आणि प्रशासकीय वाद आता न्यायालयीन कारवाईमुळे अधिक चर्चेत आला आहे.
