ओडिशातील सिमिलिपाल व्याघ्रप्रकल्पातून वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जगातील दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या काळ्या वाघांची संख्या येथे वाढली असून, २०२६ मध्ये करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षणात तब्बल १९ काळ्या वाघांची नोंद झाली आहे. या व्याघ्रप्रकल्पात एकूण ३५ प्रौढ वाघ आढळले असून, त्यापैकी १९ वाघांच्या अंगावर काळ्या रंगाचे रुंद पट्टे असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय १६ बछड्यांचीही नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सिमिलिपाल हे काळ्या वाघांच्या संवर्धनाच्या दृष्टीने जगातील महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
विशेष म्हणजे, हे वाघ पूर्णपणे काळे नसतात. त्यांच्या अंगावरील काळे पट्टे सामान्य वाघांच्या तुलनेत अधिक रुंद असल्यामुळे त्यांचा बहुतांश शरीरभाग काळसर दिसतो. या वैशिष्ट्याला वैज्ञानिक भाषेत ‘स्यूडो-मेलॅनिझम’ असे म्हटले जाते. या रंगवैशिष्ट्यामागे ‘टॅकपेप’ या जनुकातील विशिष्ट जनुकीय बदल कारणीभूत आहे. आई आणि वडील या दोघांकडून हा जनुकीय प्रकार प्राप्त झाल्यास अशा वैशिष्ट्याचे वाघ जन्माला येतात. त्यामुळे हे वाघ स्वतंत्र प्रजाती नसून बंगाल वाघांचाच एक दुर्मीळ प्रकार आहेत.
हे ही वाचा :
जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!
महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?
मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर
२०२३-२४ मध्ये करण्यात आलेल्या वाघगणनेत सिमिलिपालमध्ये २७ प्रौढ वाघ आढळले होते. त्यापैकी १३ वाघांमध्ये काळ्या पट्ट्यांचे वैशिष्ट्य होते. आता २०२६ च्या सर्वेक्षणात ही संख्या १९ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जगभरात ज्ञात असलेल्या अशा १९ काळ्या वाघांचे वास्तव्य सिमिलिपालमध्येच असल्याचे वृत्त आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अधिकृत पडताळणीसाठी भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, सिमिलिपाल व्याघ्रप्रकल्पाचा २०२६-२७ चा पर्यटन हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. पर्यटकांना येथे जंगल सफारीच्या माध्यमातून वन्यजीवांचा अनुभव घेता येणार आहे. मात्र, काळ्या वाघांची वाढती संख्या ही केवळ पर्यटनाच्या दृष्टीने नव्हे, तर वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. या दुर्मीळ वाघांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, जनुकीय विविधता जपणे आणि जंगलातील पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे.
