दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या वादग्रस्त ‘शीशमहल’ या सरकारी निवासस्थानाचे दरवाजे शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी खुले करण्यात आले. दिल्ली सरकारने या निवासस्थानातील अंतर्गत सजावट आणि फर्निचरवरील खर्चाची माहिती माध्यमांना दाखवली. लवकरच सर्वसामान्य नागरिकांनाही या बंगल्याला भेट देता येणार असून, त्यासाठी तिकीट व्यवस्था केली जाणार आहे.
दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री प्रवेश वर्मा यांनी माध्यमांना या निवासस्थानाची पाहणी घडवून आणली. यावेळी त्यांनी बंगल्यातील विविध वस्तूंच्या किमतींची माहिती दिली. त्यानुसार, येथे ५.४७ लाख रुपयांचा सोफा आणि ११ लाख रुपयांचे झुंबर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक वस्तूच्या खरेदीची बिले आणि खर्चाची माहिती उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.
‘शीशमहल’ दाखवण्यामागचा उद्देश जनतेचा पैसा कशा प्रकारे खर्च झाला, याची माहिती नागरिकांना देणे हा असल्याचे वर्मा यांनी सांगितले. या निवासस्थानासाठी ५८ कोटी रुपयांचे बजेट असल्याचेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री असताना हे निवासस्थान वापरले होते. त्यांनी बंगला रिकामा केल्यानंतर त्यातील वस्तूंमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे वर्मा यांनी स्पष्ट केले.
कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना ऑक्सिजनची गरज असताना या निवासस्थानाच्या कामाशी संबंधित फाइल्सना तातडीने मंजुरी दिल्याचा आरोपही वर्मा यांनी केला. या प्रकरणाची विधानसभा समितीकडून तपासणी केली जाणार आहे. माध्यमांच्या पाहणीनंतर सर्वसामान्य नागरिकांसाठीही हे निवासस्थान खुले करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी ऑनलाइन तिकीट आरक्षण व्यवस्था सुरू केली जाणार असून, प्रवेश शुल्क सुमारे २० रुपये असण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचाही विचार आहे. नागरिकांसाठीची पाहणी मर्यादित काळासाठी असेल. त्यानंतर या मालमत्तेचा वापर सरकारी बैठका, परिषद आणि भोजन समारंभांसाठी करण्याच्या दृष्टीने खासगी हॉस्पिटॅलिटी कंपनीची नियुक्ती करण्याचा सरकारचा विचार आहे.
हे ही वाचा :
जैशशी संबंधित संशयित दहशतवादी गुजरातमध्ये अटकेत
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!
महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?
मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर
२०१५ ते २०२४ या काळात दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांचे ६, फ्लॅगस्टाफ रोड येथील बंगला हे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. फेब्रुवारी २०२५ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भ्रष्टाचार आणि उधळपट्टीच्या आरोपांवरून केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला लक्ष्य करण्यासाठी भाजपने या बंगल्याला ‘शीश महाल’ असे नाव दिले. भाजपने असा आरोप केला आहे की, ज्या केजरीवाल यांनी यापूर्वी सरकारी वाहनही वापरणार नाही असे म्हटले होते, त्यांनी स्वतःसाठी एक आलिशान निवासस्थान बांधले.
