अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर प्रस्तावित २५ टक्के आयात शुल्काचे आव्हान असतानाही भारताच्या निर्यात क्षेत्राची घोडदौड कायम राहण्याची शक्यता आहे. मार्च २०२७ पर्यंत भारताची एकूण निर्यात १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा ओलांडेल, असा विश्वास असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम)ने व्यक्त केला आहे. असोचॅमचे महासचिव सौरभ सन्याल यांनी भारताच्या निर्यात क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना, जागतिक व्यापारातील आव्हानांवर मात करण्याची देशाची क्षमता अधोरेखित केली आहे.
भारताची निर्यात सध्या सुमारे ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार करत असून, निर्यातीत १५ टक्क्यांच्या आसपास वाढ नोंदवली जात आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार सुमारे ५९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. दोन्ही देशांदरम्यान दरमहा सरासरी ८.५ अब्ज डॉलरचा व्यापार होत आहे. अमेरिकेने प्रस्तावित केलेले २५ टक्के आयात शुल्क कमी करून १७ टक्क्यांपर्यंत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, या शुल्कविषयक अनिश्चिततेचा भारताच्या एकूण निर्यातवाढीवर मोठा परिणाम होणार नाही, असा विश्वास असोचॅमने व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
बनावट भारतीय सोशल मीडिया खात्यांमधून पाकच्या भारताविरोधात कुरापती
भारताकडून पाकिस्तान सीमेवर एस-४००ची पाचवी ढाल
हसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक
ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार
अमेरिकेवरील निर्यातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने पर्यायी बाजारपेठांकडे लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत भारताने ३७ देशांचा समावेश असलेले आठ मुक्त व्यापार करार केले आहेत. यामुळे भारतीय उत्पादकांना नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळण्याबरोबरच निर्यातीच्या संधीही वाढणार आहेत. औषधनिर्मिती, वाहन उद्योग, इलेक्ट्रिकल मशिनरी, अभियांत्रिकी उत्पादने, रत्ने आणि दागिने यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारताला मोठी निर्यात क्षमता आहे.
जागतिक व्यापारातील अनिश्चितता आणि अमेरिकेच्या शुल्कवाढीचे आव्हान असतानाही भारताने निर्यातवाढीचा महत्त्वाकांक्षी पल्ला गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, १ ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्पादनक्षमता वाढवणे, जागतिक दर्जाची गुणवत्ता राखणे आणि नव्या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता मजबूत करणे आवश्यक ठरणार आहे. भारताने या संधींचा प्रभावी वापर केल्यास जागतिक व्यापारात देशाचे स्थान अधिक भक्कम होऊ शकते.
