घरबिजनेसभारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात

पीयूष गोयल यांची घोषणा

भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित द्विपक्षीय व्यापार करार लवकरच अंतिम होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आणि पुढील कार्यवाहीचा आराखडा निश्चित करण्याच्या दिशेने प्रगती केली असल्याचे गोयल यांनी सांगितले. इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिट २०२६ मध्ये ऑनलाइन सहभागी होताना त्यांनी ही माहिती दिली. या कराराच्या प्रक्रियेत आणि पुढील वाटचालीबाबत स्पष्टता नसणे ही प्रमुख अडचण होती. मात्र, आता त्यावर तोडगा निघत असल्याने कराराचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने (यूएसटीआर) सेक्शन ३०१ अंतर्गत केलेल्या तपासणीनंतर हा प्रस्ताव पुढे आणला. भारताच्या उत्पादन क्षेत्रात गरजेपेक्षा अधिक उत्पादन क्षमता असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. मात्र, भारताने हा आक्षेप फेटाळून लावत देशाच्या उत्पादन क्षेत्रात अशी कोणतीही संरचनात्मक अतिरिक्त क्षमता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापार कराराच्या चर्चेत आयात शुल्काचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

हे ही वाचा:
‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

अमेरिकेच्या टॅरिफचे आव्हान झुगारत भारताची १ ट्रिलियन डॉलर निर्यातीची झेप!

अमेरिकेच्या शुल्क कपातीने निर्यातदारांची चिंता कायम

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

या प्रस्तावित करारातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतावरील आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १७ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास भारतीय वस्तूंवरील शुल्क कमी केले जाऊ शकते, असे अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तुलनेत बांगलादेश, कंबोडिया आणि इंडोनेशियासाठी १८ टक्के, तर व्हिएतनाम आणि चीनसाठी २० टक्के शुल्काचा प्रस्ताव आहे. त्यामुळे भारताला आशियातील प्रतिस्पर्धी निर्यातदारांच्या तुलनेत अधिक अनुकूल परिस्थिती मिळू शकते. विशेषतः अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होईल.

अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ असून, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत भारताने अमेरिकेला ५९.५२ अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा ५२ अब्ज डॉलर होता. म्हणजेच निर्यातीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम झाल्यास भारतीय उद्योग, उत्पादक आणि निर्यातदारांसाठी मोठी संधी निर्माण होऊ शकते. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा करार भारताच्या निर्यातवाढीला आणि जागतिक बाजारपेठेतील स्थानाला बळकटी देणारा ठरू शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version