घरस्पोर्ट्सलॉर्ड्सवर दादांनी भिरकावलेली जर्सी मुंबईत झळकणार!

लॉर्ड्सवर दादांनी भिरकावलेली जर्सी मुंबईत झळकणार!

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्णक्षण पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांसमोर उभा राहणार आहे. २००२ मध्ये नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीतून हवेत भिरकावलेली जर्सी आता मुंबईत प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १४, १५ आणि १७ नोव्हेंबर रोजी एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयात हे विशेष प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गांगुली यांच्या ऐतिहासिक जर्सीबरोबरच भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंच्या आठवणीही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

यामध्ये सचिन तेंडुलकरचा वनडे जंपर, महेंद्रसिंह धोनीची वनडे जर्सी, राहुल द्रविडची कसोटी जर्सी आणि अनिल कुंबळेची वनडे कॅप यांचा समावेश आहे. याशिवाय १९८२ मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या ‘ज्युबिली टेस्ट’ सामन्याचे पदकही प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.

एमसीसीने जतन केलेल्या या ऐतिहासिक वस्तू भारतीय क्रिकेटच्या समृद्ध वारशाची साक्ष देतात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी या उपक्रमाबद्दल एमसीसीचे आभार मानले. मुंबईतील क्रिकेटप्रेमींना भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडूंशी संबंधित ऐतिहासिक वस्तू जवळून पाहण्याची ही अनोखी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेटचा इतिहास जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत तो पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे गांगुलींच्या त्या ऐतिहासिक जर्सीला पुन्हा एकदा पाहण्याची संधी मुंबईकर क्रिकेटप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version