भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेले व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचा १ नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे. आपल्या मनगटाच्या जादूने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हैराण करणाऱ्या लक्ष्मण यांना ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ या नावानेही ओळखले जाते. विशेषतः कसोटी क्रिकेटच्या चौथ्या डावात केलेल्या अविस्मरणीय खेळींमुळे त्यांना ‘गॉड ऑफ फोर्थ इनिंग’ ही उपाधी मिळाली.
१ नोव्हेंबर १९७४ रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या लक्ष्मण यांनी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या दिग्गजांच्या उपस्थितीत भारतीय संघात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
२००१ मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली त्यांची २८१ धावांची ऐतिहासिक खेळी क्रिकेटविश्वात आजही अजरामर आहे. याशिवाय सिडनीमध्ये २००० साली केलेल्या १६७ धावा, अॅडलेडमध्ये २००३ मध्ये झळकावलेल्या १४८ धावा आणि श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे २०१० मध्ये केलेले शतक त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले.
लक्ष्मण यांनी १९९६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी भारतासाठी १३४ कसोटी सामन्यांत १७ शतके आणि ५६ अर्धशतकांसह ८,७८१ धावा केल्या. तर ८६ वनडे सामन्यांत ६ शतके आणि १० अर्धशतकांसह २,३३८ धावा त्यांच्या नावावर आहेत. १८ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
निवृत्तीनंतरही लक्ष्मण भारतीय क्रिकेटशी जोडलेले आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख म्हणून ते युवा खेळाडूंना घडवण्याचे काम करत आहेत. तसेच इंडिया-ए आणि युवा संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे. क्रिकेटमधील योगदानासाठी त्यांना २०११ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
