घरस्पोर्ट्सवनडे संघात जडेजाचे पुनरागमन कठीण

वनडे संघात जडेजाचे पुनरागमन कठीण

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वनडे कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी जडेजाला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन कठीण असल्याचे मत माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे.

भारतीय संघात सध्या डावखुरा फिरकी अष्टपैलू म्हणून अक्षर पटेलला प्राधान्य दिले जात आहे. आगामी वनडे विश्वचषकाला अवघे एक वर्ष शिल्लक असताना जडेजाला परदेशातील मालिकेसाठीही संधी न मिळाल्याने त्याच्या विश्वचषकातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुजाराच्या मते, वनडे क्रिकेटमध्ये जडेजाला कायम ठेवण्याचा विचार असता, तर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली असती. अक्षर पटेल हा आता संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू बनला असून त्याला अधिक संधी दिल्या जात आहेत. वयाचा विचार करता, संघ व्यवस्थापनाने जडेजाला आता कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला असण्याची शक्यता पुजाराने व्यक्त केली. त्यामुळे जडेजाची वनडे कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही तो म्हणाला.

मात्र, अभिषेक नायरने जडेजाच्या पुनरागमनाची शक्यता पूर्णपणे फेटाळलेली नाही. अक्षर पटेलनंतर जडेजाच संघासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्याचे मत आहे. अक्षरला दुखापत झाल्यास जडेजाला तातडीने संघात स्थान मिळू शकते. आगामी विश्वचषकासाठी तो राखीव पर्याय अर्थात ‘इन्शुरन्स पॉलिसी’ ठरू शकतो, असे नायरने स्पष्ट केले.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघाची योग्य बांधणी करण्याची संधी या मालिकेत भारतीय संघाला मिळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version