आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने दहावीच्या वर्गात घुसून विद्युत करवतीने (चेनसॉ) विद्यार्थिनीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी हस्तक्षेप करणारी आणखी एक विद्यार्थिनीही जखमी झाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही घटना शनिवारी सकाळी अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत घडली. वर्गात शिक्षकांच्या उपस्थितीत वर्ग सुरू असतानाच आरोपी करवत घेऊन आत घुसला आणि दहावीतील विद्यार्थिनीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एकच घबराट पसरली. हल्ल्यात विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने अनंतपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या विद्यार्थिनीने हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला असता तिलाही दुखापत झाली.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत धर्मावरम परिसरातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीकडून चौकशी सुरू असून, या हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपास केला जात आहे.
हे ही वाचा:
तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार
सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये धर्मध्वज फडकला
लंडनमध्ये असल्याचे भासवून तरुणीचे पुण्यात वास्तव्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
मतचोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्यास तयार
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी विद्यार्थिनीवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
