महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी (३१ ऑक्टोबर) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा उत्साहात पार पडला. नाशिकमध्ये रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कुंभध्वजारोहण करण्यात आले, तर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वज फडकवण्यात आला. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण झाले. या सोहळ्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.
कुंभपर्वाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विविध आखाड्यांचे प्रमुख, पुरोहित संघाचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींचा समावेश होता. धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
ध्वजारोहणापूर्वी ध्वजदंड आणि धर्मध्वजेचे विधिवत पूजन करण्यात आले. पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली पूजा पार पडली. यावेळी धूप, दीप, नैवेद्य आणि द्रव्यदक्षिणा अर्पण करण्यात आली. तसेच गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी या सप्तनद्यांच्या जलाने अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली. विविध देवता आणि दिक्पालांचे आवाहन करत पाद्य, अर्घ्य, आचमनीय आणि स्नान अर्पण करण्यात आले. ‘धर्मध्वजाय नमः’ असा जयघोष करत धर्मध्वजा फडकवण्यात आली.
हे ही वाचा:
लंडनमध्ये असल्याचे भासवून तरुणीचे पुण्यात वास्तव्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
मतचोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्यास तयार
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू टँकरवर माइन हल्ला
अवकाश शास्त्रज्ञांच्या समर्पणाचा देशाला अभिमान!
हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि पारंपरिक तयारीची नांदी मानला जात आहे. ध्वजारोहणामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या वातावरणाला सुरुवात झाली असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
