होर्मुझच्या सामुद्रधुनीत एका तेलवाहू टँकरवर लिम्पेट माइनद्वारे हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या पनामा-ध्वजधारी टँकरवर २७ भारतीय खलाशी होते. सुदैवाने हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नसून सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे.
एटी लोईस- वन या कच्च्या तेलवाहू टँकरला होर्मुझच्या सामुद्रधुनीत लक्ष्य करण्यात आले. सागरी सुरक्षा सूत्रांनुसार, एका छोट्या नौकेने टँकरच्या बाह्य भागाला दोन लिम्पेट माइन जोडल्या. त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली आणि काही काळासाठी टँकरची कार्यक्षमता प्रभावित झाली. मात्र, कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून जहाजाने पुढील प्रवास सुरू ठेवल्याची माहिती आहे.
संबंधित घटना ओमानमधील खसबपासून सुमारे २५ नॉटिकल मैल अर्थात ४६ किलोमीटर ईशान्येला घडल्याचे ब्रिटनच्या युनायटेड किंग्डम ट्रेड ऑपरेशन्स या सागरी संस्थेने म्हटले आहे. हल्ल्यामागे नेमके कोण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारी जहाजवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, जहाजावरील सर्व २७ भारतीय खलाशी पूर्णपणे सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही. भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून जहाज व्यवस्थापन कंपन्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
अवकाश शास्त्रज्ञांच्या समर्पणाचा देशाला अभिमान!
इस्रोची कमाल! GSLV-F18 रॉकेटद्वारे NVS-03 उपग्रह अवकाशात
लंगोटी सुटली तरी नाचतोय अब्दुल!
राऊत आता काँग्रेसचा तंबू उखडण्याच्या तयारीत
दरम्यान, २९ ऑक्टोबरला एमटी अर्झनाह या लायबेरिया-ध्वजधारी तेलवाहू जहाजावरही प्रक्षेपणास्त्राद्वारे हल्ला झाल्याची माहिती आहे. या जहाजावर दोन भारतीय नागरिक होते आणि तेही सुरक्षित आहेत. त्यामुळे या दोन स्वतंत्र घटनांमधील एकूण २९ भारतीय खलाशी सुखरूप असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
