पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात एका ३४ वर्षीय तरुणीचा भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुग्धा देशमुख असे मृत तरुणीचे नाव असून, ती लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असल्याची तिच्या कुटुंबीयांची समजूत होती. मात्र, ती ऑगस्ट महिन्यातच कोणालाही न सांगता भारतात परतली होती. विशेष म्हणजे, तिच्या बँक खात्यातील फूड डिलिव्हरी आणि ऑनलाइन सेवांच्या व्यवहारांमुळे ती भारतात असल्याचा संशय कुटुंबीयांना आला आणि अखेर तिचा ठावठिकाणा समोर आला.
मुग्धा ही मूळची छत्रपती संभाजीनगरची रहिवासी होती. जुलै २०२५ मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी ती लंडनला गेली होती. तिथे ती पार्टटाइम नोकरीही करत होती. कुटुंबीयांशी तिचा फोन आणि मेसेजद्वारे नियमित संपर्क होता. मात्र, २४ ऑक्टोबरपासून तिचा फोन बंद येऊ लागल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. तिच्या वडिलांनी अविनाश देशमुख यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, लंडनमधील तिच्या मैत्रिणीनेही पोलिसांकडे चौकशी केली असता, मुग्धा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच ब्रिटन सोडून गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कुटुंबीयांना धक्का बसला.
मुग्धाच्या वडिलांनी तिच्या बँक खात्याचे व्यवहार तपासले असता, ८ ते २५ ऑक्टोबरदरम्यान फूड डिलिव्हरी आणि इतर ऑनलाइन सेवांशी संबंधित अनेक व्यवहार झाल्याचे दिसून आले. यातील एका व्यवहाराचा संबंध छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा परिसराशी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ती भारतातच असल्याचा संशय बळावला. कुटुंबीयांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी व्यवहार आणि ऑनलाइन डिलिव्हरीच्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
हे ही वाचा:
मतचोरीच्या आरोपांवर संसदेत चर्चा करण्यास तयार
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू टँकरवर माइन हल्ला
अवकाश शास्त्रज्ञांच्या समर्पणाचा देशाला अभिमान!
इस्रोची कमाल! GSLV-F18 रॉकेटद्वारे NVS-03 उपग्रह अवकाशात
या तपासातून मुग्धा पुण्याजवळील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत राहत असल्याचे समोर आले. पोलिसांनी संबंधित फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता, मुग्धाचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरावर बाह्य जखमांच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या तपासात मुग्धाने एप्रिल महिन्यातच हा फ्लॅट भाड्याने घेतल्याचे समोर आले. मात्र, लंडनहून परतल्यानंतर ऑगस्टमध्ये ती येथे राहायला आली होती. तिने कुटुंबीयांना भारतात परतल्याची माहिती का दिली नाही आणि तिच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
