घरव्हिडीओ गॅलरीक्राईम टाइमडिजीटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांना ४० लाखांना लुटले

डिजीटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांना ४० लाखांना लुटले

जीवाला धोका असल्याचे सांगून तक्रारदाराला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.

मुंबई : ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देत सायबर भामट्यांनी ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूर्व विभागीय सायबर पोलिस ठाण्यात चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास सुरू आहे.
मुलुंडच्या सर्वोदय नगर परिसरात एकटे राहणारे तक्रारदार निवृत्त असून त्यांचे दोन्ही पुत्र अमेरिकेत स्थायिक आहेत. डिसेंबर महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कॉल करणाऱ्याने आपण खासगी कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगत, तक्रारदारांच्या आधारकार्डचा वापर करून त्यांच्या नावाने बँकॉकला पाठवलेले एक पार्सल सीमाशुल्क विभागाने जप्त केल्याचा दावा केला. त्या पार्सलमध्ये आक्षेपार्ह साहित्य सापडल्याचेही त्याने सांगितले.
यानंतर कॉल एका कथित ‘सायबर सेल अधिकारी’कडे वळवण्यात आला. स्वतःचे नाव अमित असल्याचे सांगणाऱ्या या व्यक्तीने पार्सलमध्ये अंमली पदार्थ आढळल्याचा आरोप करत, या प्रकरणाचा संबंध एका आमदाराशी असल्याचा बनाव रचला. तसेच प्रकरणाबाबत कुणाशीही चर्चा न करण्याची ताकीद देत, जीवाला धोका असल्याचे सांगून तक्रारदाराला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले.
हे ही वाचा:
इराणच्या आंदोलनामध्ये ५,००० लोकांचा मृत्यू

झारखंडमधील भीषण अपघातात ५ ठार, २५ जखमी

वादानंतर मार्कर पेन जाणार, बाटलीतील शाई येणार

फडणवीस आणणार महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक
तक्रारदाराने आपण कोणतेही पार्सल पाठवले नसल्याचे स्पष्ट करूनही आरोपींनी अटक व कारावासाची धमकी देत चौकशी सुरूच ठेवली. ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येईल, घराबाहेर जाण्यास व कोणाशीही संपर्क साधण्यास मनाई केली जाईल, असे सांगत आरोपींनी बँक खात्यांची माहिती घेतली. भीतीपोटी तक्रारदाराने विविध बँक खात्यांमध्ये सुमारे ४० लाख रुपये वर्ग केले.
नंतर चौकशी पूर्ण झाल्याचे सांगत, दोन टक्के शुल्क वजा करून रक्कम परत देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून संबंधित बँक खात्यांचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version