नेहरु-गांधी खानदानाचे तीन पंतप्रधान देशाने पाहीले. इटालियन सूनबाई सोनिया गांधी यातर यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधानांपेक्षा वरचढ होत्या. त्याच खानदानाचा दिवा असलेल्या राहुल गांधींना पोलिस उचलून जीपमध्ये फेकतायत, असे चित्र देशाच्या जनतेने पाहीले. बुधवारी ते जंतर मंतरच्या दिशेने निघाले होते. वाटेत अडवल्यानंतर त्यांनी रस्त्यावर आंदोलनाच्या नावाखाली तमाशा केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. एकूणच पोलिसांनी आपल्याला अटक करावी, जेणे करून देशात आग पेटेल, असा सर्वतोपरी प्रयत्न राहुल गांधी करतायत. अर्थात अटक केल्यानंतर आग पेटेल असा त्यांचा समज आहे, तो गैरसमज असण्याची शक्यता जास्त आहे. देशात राजकीय असंतोषाचे चित्र निर्माण करण्यासाठी त्यांनी जो मुहुर्त निवडलाय तो अगदी हिंदू सणवार तोंडावर असतानाचा आहे. काँग्रेस पक्षाचे रबरस्टॅप अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल बुधवारी इंडिया आघाडीतील पक्षांची भोजन बैठक बोलावली होती. आगामी काळातील रणनीतीची या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर तीन बस भरून काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल आणि प्रियांका यांच्या सोबत जंतर मंतरच्या दिशेने निघाले. पोलिसांनी मध्येच अडवल्यानंतर त्यांचा भररस्त्यात तमाशा सुरू झाला. या आंदोलनात इंडिया आघाडीचा एकही बडा नेता नव्हता, काही पक्षांचे मोजके खासदार होते. खानापूर्तीसाठी ते आले होते. ममता बॅनर्जी गेल्या आठवड्यात दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत जोरदार भाषण ठोकून कधीच अंतर्धान पावलेल्या आहेत.
