मॅट्रिमोनियल साइटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने लग्नाचे आमिष दाखवत मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आरोपींनी परदेशी बँक खात्यात कोट्यवधी रुपये असल्याचे भासविण्यासाठी बनावट बँक पोर्टल तयार केले. तसेच सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली पोलीस आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या नावाने बनावट प्रमाणपत्रे पाठवून महिलेचा विश्वास संपादन केला.
या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील एका महत्त्वाच्या विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने विवाहासाठी ‘जीवनसाथी डॉट कॉम’वर नोंदणी केली होती.
हे ही वाचा:
परत या…परत या… अमेरिकेहून परत या!
एसआयआर मुद्द्यावरून इंडिया आघाडीत मतभेद?
लैंगिक छळाच्या आरोपांनंतर काँग्रेस खासदार प्राध्यापकाला जेएनयूतून हाकलले
मुस्लिमांचे मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपाचा डंका
जुलै २०२६ मध्ये तिची ‘सुनील सिंग’ नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. त्याने आपण ब्रिटनचा नागरिक असल्याचे सांगत महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. भारतात येत असल्याचे भासवण्यासाठी त्याने तिला बनावट विमान तिकीटही पाठवले.
यानंतर आरोपीने ‘जंट क्रेडिट युनियन’ नावाच्या बनावट बँकिंग पोर्टलवर महिलेच्या नावावर सहा लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे पाच कोटी रुपये जमा असल्याचे दाखवले. ही रक्कम भारतातील तिच्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी आरबीआय टॅक्स क्लिअरन्स, कस्टम्स चार्ज आणि स्विफ्ट ॲक्टिव्हेशन फीच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली.
फसवणुकीला अधिकृत स्वरूप देण्यासाठी आरोपींनी सीबीआय, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय, दिल्ली पोलिस तसेच UNODC यांसारख्या संस्थांच्या नावाने बनावट ‘अँटी-टेररिस्ट क्लिअरन्स’ आणि ना-हरकत प्रमाणपत्रे ईमेलद्वारे पाठवली.
या कागदपत्रांवर विश्वास ठेवून महिलेने २७ जुलै ते २ सप्टेंबरदरम्यान ९ लाख ४८ हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा केले. दरम्यान, ‘भारत मॅट्रिमोनी’च्या माध्यमातून कॅनडाचा रहिवासी असल्याचे सांगणाऱ्या ‘विशाल अगरवाल’ नावाच्या आणखी एका व्यक्तीनेही महिलेच्या संपर्कात येत वेगवेगळ्या कारणांचा आधार घेत तिच्याकडून ८ लाख ४९ हजार रुपये उकळले.
आरोपींनी पाठवलेली सरकारी आणि न्यायालयीन कागदपत्रे बनावट असल्याचे ५ ऑक्टोबर रोजी महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने तातडीने १९३० सायबर हेल्पलाइनवर तक्रार केली. एकूण १७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), ३३८ आणि ६१(२) तसेच माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
