घरक्राईमनामा'इन्स्पेक्टर संजय'ने मोबाईल शोधण्याच्या नावावर घातला गंडा

‘इन्स्पेक्टर संजय’ने मोबाईल शोधण्याच्या नावावर घातला गंडा

बेकायदेशीर सीडीआर, लोकेशन पुरवणारे रॅकेट उद्ध्वस्त;

गहाळ किंवा चोरी झालेले मोबाइल शोधून देण्याच्या बहाण्याने सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आणि बेकायदेशीररीत्या गोपनीय कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच मोबाइल लोकेशन पुरवणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा मुंबई गुन्हे शाखा कक्ष-१२ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी महाराष्ट्र, झारखंड आणि बिहारमधून पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून, यामध्ये झारखंड व बिहार पोलिस दलातील दोन सक्रिय पोलिस शिपायांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ओशिवरा परिसरात राहणारा एक भामटा इन्स्टाग्रामवर “चोरीला गेलेले अथवा हरवलेले मोबाइल शोधून मिळतील” अशी जाहिरातबाजी करत होता. मोबाइल गमावलेले नागरिक त्याच्या आमिषाला बळी पडून संपर्क साधत असत. त्या वेळी तो स्वतःची ओळख पोलिस दलातील ‘इन्स्पेक्टर संजय’ अशी करून देत नागरिकांकडून मोठी रक्कम उकळत होता.

या तोतया पोलिसाबाबत ठोस माहिती मिळताच कक्ष-१२ च्या पथकाने जोगेश्वरी पश्चिम येथील एस. व्ही. रोड परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोबाइलची तपासणी केली असता, तो इतर साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीररीत्या एसडीआर, सीडीआर आणि मोबाइल लोकेशन मिळवत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.

हे ही वाचा:

परत या…परत या… अमेरिकेहून परत या!

जंतरमंतर आंदोलनापुर्वी दिल्ली पोलिसांचे नागरिकांना खुले पत्र

एसआयआर मुद्द्यावरून इंडिया आघाडीत मतभेद?

मुस्लिमांचे मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपाचा डंका

खाकी वर्दीतील काळे कारनामे उघड

गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे या रॅकेटची पाळेमुळे खणून काढत वरच्या फळीतील (अपर लिंक) ९ आरोपींची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात धडक मोहीम राबवून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये झारखंड व बिहार पोलिस दलातील दोन कॉन्स्टेबलचा समावेश असून, ते पोलिसांच्या अधिकृत यंत्रणेचा गैरवापर करून हा गोपनीय डेटा बाहेर विकत असल्याचे उघड झाले आहे.

तपासादरम्यान या टोळीने आतापर्यंत ५० सीडीआर, ५२० पेक्षा जास्त एसडीआर, ५५० हून अधिक मोबाइलचे लोकेशन आणि ४२० पेक्षा जास्त आयएमईआय क्रमांकांची अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले ७ मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-१२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप येडे-पाटील व पथकाने केली. या रॅकेटचे जाळे आणखी कुठे पसरले आहे आणि यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिस कसून तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version