निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना, विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सहभागी होणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता इंडिया आघाडीतील नेते राष्ट्रपतींची भेट घेऊन निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या शिष्टमंडळात सहभागी होणार नसल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
१३ अमेरिकन सैनिकांची हत्या करणाऱ्या हसनच्या मृत्युदंडाचे थेट प्रक्षेपण
मुस्लिमांचे मतदारसंघ असलेल्या नंदीग्राम, रेजीनगरमध्ये भाजपाचा डंका
इंडिगो, एअर इंडिया, अकासा एअरचा प्रवाशांना मोठा झटका
ठाकरे गटाने या निर्णयामागे महाराष्ट्रातील पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण दिले आहे. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी ऐनवेळी निमंत्रण मिळाल्यामुळे नियोजनात अडचण निर्माण झाल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे मुंबईत पक्षाच्या खासदार आणि विभागप्रमुखांसोबत बैठका घेत असल्याने ते दिल्लीतील भेटीसाठी जाणार नसल्याचे वृत्त आहे. खासदार संजय राऊत हेही पुणे दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रपतींच्या भेटीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. लोकशाही आणि संविधानिक संस्थांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांशी आपण सहमत असल्याचे पक्षाने पत्रातून स्पष्ट केले आहे. त्यामुळे या अनुपस्थितीचा अर्थ इंडिया आघाडीतून बाहेर पडणे असा थेट लावता येणार नाही.
दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी या घडामोडीवरून विरोधकांवर टीका केली आहे. इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले. आता राष्ट्रपतींच्या भेटीतील अनुपस्थितीचा राजकीय अर्थ काय काढला जातो आणि विरोधी पक्षांमधील समन्वय कसा राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
