विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील प्रमुख विमान कंपन्यांनी इंधन अधिभारात वाढ केल्यामुळे विमान प्रवासाचा खर्च वाढणार आहे. इंडिगोनंतर एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि अकासा एअरनेही इंधन अधिभार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर ९ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असून, त्याचा भार आता थेट प्रवाशांवर पडणार आहे. त्यामुळे विमानाचे तिकीट बुक करताना प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसने देशांतर्गत विमान प्रवासासाठी अंतरानुसार इंधन अधिभार निश्चित केला आहे. त्यानुसार ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी ४०० रुपये, ५०१ ते १,००० किलोमीटरसाठी ६०० रुपये, १,००१ ते १,५०० किलोमीटरसाठी ८५० रुपये, तर १,५०१ किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी १,२०० रुपये इंधन अधिभार आकारला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही अधिभारात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासखर्चातही वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
रणजी ट्रॉफीत जडेजाची एन्ट्री; सौराष्ट्रच्या संघात समावेश
स्मृतीने स्वतःची नेतृत्वशैली घडवावी!
बृजभूषण सिंह प्रकरण पुन्हा न्यायालयात!
नोएडा विमानतळाचे नाव ‘नरेंद्र मोदी जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळ’
अकासा एअरनेदेखील देशांतर्गत मार्गांवर ३७५ रुपयांपासून १,१५० रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू केला आहे. तर निवडक आंतरराष्ट्रीय मार्गांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याआधी इंडिगोनेही आपल्या विमान प्रवासाच्या इंधन अधिभारात वाढ केली होती. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये विमान इंधनाचा मोठा वाटा असतो. त्यामुळे इंधनाच्या किमती वाढल्या की कंपन्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम होतो. हा खर्च भरून काढण्यासाठी कंपन्या तिकिटांवर अतिरिक्त अधिभार लावत आहेत. परिणामी, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या दरवाढीचा परिणाम केवळ पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांवरच नव्हे, तर कामानिमित्त वारंवार विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांवरही होणार आहे. विशेषतः कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक तिकिटामागे वाढणारा खर्च लक्षात घेऊन बजेट आखावे लागणार आहे. सणासुदीच्या काळात आणि सुट्ट्यांच्या नियोजनादरम्यान विमान तिकिटांचे दर वाढल्यास प्रवाशांच्या खर्चात आणखी भर पडू शकते. त्यामुळे विमान प्रवासाचे नियोजन करताना तिकिटाची मूळ किंमत, इंधन अधिभार आणि इतर शुल्क यांची तुलना करणे महत्त्वाचे ठरणार आहे. जागतिक बाजारपेठेतील इंधनाच्या किमती आणि विमान कंपन्यांच्या पुढील निर्णयांवर आगामी काळात विमान प्रवास किती महाग होणार, हे अवलंबून असेल.
