पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीविरोधात पोलीस मुख्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) मनस्वी वशिष्ठ यांना निलंबित करण्यात आले आहे. सोमवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर शेकडो पोलीस कर्मचारी एकत्र आले होते. या आंदोलनात वशिष्ठ यांनी सहभागी होत कर्मचाऱ्यांना संबोधित केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी (३ नोव्हेंबर) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्याचे वृत्त आहे.
या वादाची सुरुवात २३ ऑक्टोबर रोजी शाहदरा पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेपासून झाली. या ठिकाणी वकील ललित बन्सल यांना झालेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर पोलीस ठाण्यात आलेल्या वकिलांनी एसीपी मनस्वी वशिष्ठ आणि पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. वशिष्ठ यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याचा आरोपही वकिलांनी केला होता. या घटनेच्या निषेधार्थ दिल्लीतील वकिलांनी बेमुदत संप पुकारला होता.
हे ही वाचा:
माउंट एव्हरेस्ट परिसरात दोन हेलिकॉप्टरची धडक
ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; एक खलाशी ठार
छत्रपती संभाजीनगरमधून २,२७९ लिटर पतंजली तूप जप्त
दिवाळीपूर्वीच दिल्ली प्रदूषणाच्या विळख्यात
या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबर रोजी वशिष्ठ यांची गांधी नगर विभागातून महिला आणि बालकांसाठीच्या विशेष पोलीस विभागात (SPUWAC), तर शाहदरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण कुमार यांची सुरक्षा विभागात बदली करण्यात आली होती. या बदल्यांनंतर वकिलांनी संप मागे घेतला. मात्र, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. बदल्यांच्या निषेधार्थ सोमवारी सुमारे ५०० पोलीस कर्मचारी मुख्यालयात एकत्र आले. वशिष्ठ आणि अरुण कुमार यांच्या बदल्या रद्द करून त्यांना पूर्वीच्या पदांवर पुन्हा नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
