घरविशेषयुट्यूबर भुवन बामविरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल

युट्यूबर भुवन बामविरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल

विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील टिप्पणीचा आरोप

गुजरातमधील वडोदरा येथे एका विद्यापीठात आयोजित कॉमेडी कार्यक्रमादरम्यान कथित अश्लील टिप्पणी आणि आक्षेपार्ह हावभाव केल्याप्रकरणी प्रसिद्ध युट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम याच्या अडचणी वाढल्या आहेत. गुजरात पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २५ नोव्हेंबर रोजी वडोदरा येथील पारुल विद्यापीठाच्या परिसरात ‘द लावरी शो’ या कॉमेडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भुवन बाम, अभिनेत्री संजीदा शेख यांच्यासह अन्य कलाकार सहभागी झाले होते. कार्यक्रमातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झाला.

कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री संजीदा शेख यांच्याशी संवाद साधताना भुवन बामने कथित आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याशिवाय पाण्याच्या बाटलीचा वापर करून अश्लील हावभाव केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेषतः विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेच्या परिसरात विद्यार्थ्यांसमोर अशा प्रकारचे सादरीकरण करणे अयोग्य असल्याची टीका अनेकांनी केली. या घटनेनंतर भुवन बामवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली.

या प्रकरणी पारुल विद्यापीठाचे सुरक्षा विभागप्रमुख महेंद्र प्रताप सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेत लिमडा गावातील विद्यापीठ परिसरात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला परवानगी देताना आयोजकांना विद्यापीठाची प्रतिष्ठा, शिस्त आणि शैक्षणिक वातावरण यांचे भान राखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कथित आक्षेपार्ह टिप्पणी आणि कृत्यांबाबत विद्यापीठ प्रशासनाला पूर्वकल्पना नव्हती किंवा त्यासाठी परवानगीही देण्यात आली नव्हती, असे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत भुवन बामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कलम सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये आणि वक्तव्यांशी संबंधित आहे. वडोदरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुशील अग्रवाल यांनी गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे मनोरंजनाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या विनोदांच्या मर्यादा आणि सार्वजनिक कार्यक्रमांमधील कलाकारांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version