मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य व हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक असेल. या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही गाड्या जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.
माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीहून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा-मुलुंडदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या लोकलना सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबे देण्यात येतील. मुलुंड येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येणाऱ्या या गाड्या गंतव्यस्थानी सुमारे १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
त्याचप्रमाणे, ठाण्याहून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन येथे थांबतील. माटुंगा येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळवल्यानंतर त्या निर्धारित वेळेपेक्षा सुमारे १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
सीएसएमटी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत येणाऱ्या आणि तेथून सुटणाऱ्या अप व डाउन लोकल गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
हार्बर मार्गावरील अनेक फेऱ्या रद्द
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत, तर चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ या कालावधीत, तर वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या लोकल सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या कालावधीत रद्द राहतील.
पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत, तर गोरेगाव आणि वांद्रे येथून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत रद्द राहतील.
प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था
मेगा ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी/नेरूळ-ठाणे ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा तसेच नेरूळ/बेलापूर-उरण मार्गावरील पोर्ट लाइन सेवा निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरून आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वे मार्गावरील पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवासाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा मेगा ब्लॉक आवश्यक असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
