मराठी रंगभूमी, बालनाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या कल्पक लेखनाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा प्रतिष्ठेचा ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनानिमित्त सांगली येथे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सई परांजपे यांनी बालसाहित्यापासून आपल्या सर्जनशील प्रवासाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा ‘मुलांचा मेवा’ हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. पुढे त्यांनी बालनाट्य, प्रौढ नाटके, नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अनुवाद अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली. ‘पक्ष्यांचे कवीसंमेलन’, ‘पत्ते नगरीत’, ‘झाली काय गंमत’, ‘जादूचा शंख’ आणि ‘शेपटीचा शाप’ यांसारख्या बालनाट्यांतून त्यांनी मुलांच्या कल्पनाविश्वाला नवे रंग दिले. त्यांच्या लेखनातील विनोद, कल्पकता आणि सहजसुंदर मांडणीमुळे ही नाटके लोकप्रिय झाली. प्रौढ रंगभूमीवरही ‘नांदा सौख्यभरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘जास्वंदी’, ‘सोयरीक’, ‘माझा खेळ मांडू दे’ आणि ‘मोगरा फुलला’ यांसारख्या नाटकांनी आपली वेगळी छाप उमटवली. ‘जास्वंदी’ या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट नाट्यनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.
हे ही वाचा:
मध्य रेलवर रविवारी मेगा ब्लॉक
जंतरमंतर आंदोलनापुर्वी दिल्ली पोलिसांचे नागरिकांना खुले पत्र
एसआयआर मुद्द्यावरून इंडिया आघाडीत मतभेद?
लैंगिक छळाच्या आरोपांनंतर काँग्रेस खासदार प्राध्यापकाला जेएनयूतून हाकलले
मराठी रंगभूमीच्या चौकटीपलीकडे जाऊन भारतीय नाट्यपरंपरेतील विविध प्रयोग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यातही सई परांजपे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशाला हिंदी रंगभूमीवर नेण्यासाठी त्यांनी ‘एक तमाशा अच्छा खासा’ आणि ‘धिक् ताम’ या नाटकांवर काम केले. परभाषिक नाटकांचे मराठी आणि हिंदीमध्ये रूपांतर करताना त्यांनी मूळ कलाकृतीचा आशय कायम ठेवत स्थानिक प्रेक्षकांच्या अभिरुचीशी सुसंगत मांडणी केली. त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत भारत सरकारने २००६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. आता ‘विष्णुदास भावे गौरव पदका’च्या माध्यमातून त्यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा गौरव होणार आहे. हा सन्मान केवळ एका ज्येष्ठ कलावंताच्या कार्याची पोचपावती नसून मराठी रंगभूमीची परंपरा समृद्ध करणाऱ्या सर्जनशीलतेचा गौरवही मानला जात आहे.
