पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. रविवार, २५ ऑक्टोबर रोजी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री, म्हणजेच २४ व २५ ऑक्टोबरच्या रात्री सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉकचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
या कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान धावणाऱ्या सर्व जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. तसेच, या ब्लॉकमुळे काही उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
रद्द होणाऱ्या लोकल गाड्यांची सविस्तर माहिती पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागातील सर्व स्थानकांच्या स्टेशन मास्तरांकडे उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आवश्यक माहिती घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
