अन्न नियामक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) शनिवारी एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि लालजी गोधू अँड कंपनीला हिंग पावडरची विक्री करण्यास मनाई केली. तपासणीमध्ये त्यांच्या हिंग पावडरचे नमुने निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे आढळून आले.
सामाजिक माध्यमांवरील एका पोस्टद्वारे एफएसएसएआयने ही माहिती दिली. दोन्ही कंपन्यांच्या हिंग पावडरचे नमुने निकृष्ट दर्जाचे आढळल्याने त्यांच्याविरोधात विक्रीबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
एव्हरेस्टच्या बाबतीत मिश्रित हिंग पावडरच्या विविध प्रकारांची विक्री तातडीने थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एफएसएसएआयने सांगितले की, प्राथमिक अन्न प्रयोगशाळेतील अन्न विश्लेषकाने केलेल्या तपासणीत मिश्रित हिंग पावडरचे नमुने खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या लेबलसह तसेच निर्धारित मानकांपेक्षा कमी दर्जाचे असल्याचे आढळले.
हे नमुने अन्न उत्पादने आणि अन्न पदार्थांशी संबंधित २०११ च्या नियमांमधील तरतुदींशी विसंगत असल्याचेही आढळले. तपासणीत हिंगमधून मिळणाऱ्या अल्कोहोल-विरघळणाऱ्या अर्काचे प्रमाण शून्य टक्के होते, तर निर्धारित मानकानुसार हे प्रमाण किमान ५ टक्के असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा:
आशा चौकसेची एशियन गेम्समध्ये सुवर्णवेधाची तयारी
गृहमंत्री म्हणून आंदोलनांना सामोरे जाणे हेच माझ्या नशिबात!
प्रचंड मोठी लाट बसच्या दिशेने आली…दांपत्याने ५०० पायऱ्या चढत वाचवला जीव
पिवळ्या आणि काळ्या हिंग पावडरमध्येही त्रुटी
एफएसएसएआयने पुढे सांगितले की, पिवळी हिंग पावडर आणि काळी हिंग पावडर यांचे नमुनेही निर्धारित मानकांपेक्षा कमी दर्जाचे आढळले. पिवळ्या हिंग पावडरमध्ये अल्कोहोल-विरघळणाऱ्या अर्काचे प्रमाण ३.२९ टक्के, तर काळ्या हिंग पावडरमध्ये हे प्रमाण ४.४ टक्के आढळले. दोन्ही प्रमाणे निर्धारित ५ टक्क्यांच्या किमान मानकापेक्षा कमी आहेत.
