पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिलिपिन्समधील मनिला दौऱ्यादरम्यान जागतिक नेत्यांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणाऱ्या खास भेटवस्तू दिल्या. या भेटवस्तूंमध्ये काश्मिरी सिल्क कार्पेट, राजस्थानमधील पिचवाई चित्रकला, गुजरातची रोगन कला, कर्नाटकचे बिदरीकाम आणि बनारसी रेशमी वस्त्रांचा समावेश आहे. भारतातील विविध प्रांतांमधील पारंपरिक कलाकुसर आणि कारागिरांचे कौशल्य जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याचा या भेटवस्तूंमागील उद्देश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राजस्थानच्या नाथद्वारा येथील सुवर्ण पिचवाई चित्र भेट दिले. कापडावर साकारल्या जाणाऱ्या या पारंपरिक चित्रकलेत खनिज रंग आणि सोन्याचा वापर केला जातो. कमळ, गायी, झाडे आणि आकर्षक नक्षीकाम ही या चित्रांची वैशिष्ट्ये आहेत. तर फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांना काश्मिरी सिल्क कार्पेट भेट देण्यात आले. हाताने हजारो गाठी बांधून तयार केले जाणारे हे कार्पेट तयार करण्यासाठी अनेक महिने, तर काही वेळा वर्षभराचा कालावधी लागतो. फिलिपिन्सच्या प्रथम महिला लिझा अरनेटा मार्कोस यांना पपिएर माशेच्या सजवलेल्या पेटीत पाश्मिना शाल भेट देण्यात आली.
जपानच्या पंतप्रधान साने ताकाइची यांना बनारसची रॉयल ब्लू बनारसी कतान सिल्क स्टोल भेट देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना जयपूरमधील ब्लू पॉटरीची कलाकृती देण्यात आली. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल यांना गुजरातच्या कच्छमधील रोगन कलाकुसरीचे चित्र भेट देण्यात आले. एरंडेल तेलापासून तयार केलेल्या विशिष्ट रंगाचा वापर करून कापडावर धातूच्या सळईने ही नक्षी साकारली जाते. ही कला कच्छमधील मोजक्या कारागीर कुटुंबांकडून जपली जात आहे.
हे ही वाचा:
रशियाचे लष्करी विमान कोसळून १९ जणांचा मृत्यू
सीआरपीएफ चौकीवरील हल्ल्यातील संशयित लष्कर कमांडर लतीफ भट ठार
ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला २७ वर्षांची शिक्षा
मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले
याशिवाय कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांना डोकरा धातुकलेतून तयार केलेली नाव, व्हिएतनामचे पंतप्रधान ले मिन्ह हंग यांना पारंपरिक चामड्यावरील कलाकुसरीचे भित्तिचित्र, तर तिमोर-लेस्तेचे पंतप्रधान झानाना गुसमाओ यांना गुजरातच्या खंभातमधील अॅगेट दगडापासून तयार केलेले भांडे भेट देण्यात आले. म्यानमार आणि ब्रुनेईच्या सुलतानांना कर्नाटकातील बिदरीकाम केलेली चांदीच्या नक्षीची फुलदाणी देण्यात आली. लाओसचे पंतप्रधान सोनेक्साय सिफांडोन यांना सोन्याच्या नक्षीकाम केलेली गुलाबी क्वार्ट्झ दगडाची हत्तीची कलाकृती भेट देण्यात आली.
