अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पाकिस्तानी नागरिक आसिफ मर्चंट याला अमेरिकेतील न्यायालयाने २७ वर्षांहून अधिक काळ तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ब्रुकलिन येथील फेडरल न्यायालयाने मंगळवारी (१७ नोव्हेंबर) हा निकाल दिला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निर्देशावरून अमेरिकेतील प्रमुख राजकीय नेत्यांची हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याचा मर्चंटवर आरोप होता.
४८ वर्षीय आसिफ मर्चंट याला न्यायालयाने ३३० महिन्यांची म्हणजेच २७ वर्षे आणि ६ महिन्यांची शिक्षा सुनावली. अमेरिकेच्या न्याय विभागाने यासंदर्भात माहिती दिली. २०२० मध्ये अमेरिकेने इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांची हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेतील राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
मर्चंटने अमेरिकेत या हत्येचा कट प्रत्यक्षात आणण्यासाठी काही लोकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला होता. त्याने संभाव्य मारेकऱ्यांना पाच हजार डॉलरची रक्कमही दिली होती. मात्र, ज्यांना तो मारेकरी समजत होता, ते प्रत्यक्षात अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) गुप्त अधिकारी होते. त्यामुळे हा कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले.
मर्चंटने न्यायालयातील सुनावणीदरम्यान आपण इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या संपर्कात होतो, अशी कबुली दिली होती. मात्र, या कटात सहभागी होण्यामागे आपली इच्छा नव्हती, तर तेहरानमध्ये राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी आपण हे केले, असा दावा त्याने केला. त्याच्या म्हणण्यानुसार, संबंधित इराणी अधिकाऱ्याने संभाव्य लक्ष्य म्हणून ट्रम्प, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन नेत्या निक्की हेली यांची नावे घेतली होती.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर स्पाईसजेटचे शेकडो प्रवासी अडकले
सरकार तुमचे सिस्टीम आमची हे १२ वर्षांनंतरही कायम ?
मनातून माफी नको, मनापासून माफी मागा!
पंतप्रधान मोदींच्या विमानाचे सारथ्य पहिल्यांदाच महिलेच्या हाती!
दरम्यान, अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी एप्रिल २०२४ मध्येच या कटाची माहिती मिळवली होती. मर्चंटने ज्या व्यक्तींकडे हत्येसाठी मदत मागितली, त्यांच्यापैकी एकाने तपास यंत्रणांना माहिती दिली आणि गुप्त माहितीदार म्हणून काम केले. त्यानंतर १२ जुलै २०२४ रोजी टेक्सासमध्ये पाकिस्तानला जाण्याच्या तयारीत असताना मर्चंटला अटक करण्यात आली.
