रामजन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख स्तंभ, प्रखर राष्ट्रवादी आणि सेवा, समरसतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्या व्यापक देशकार्याचे स्मरण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पत्राच्या माध्यमातून केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र असे-
एक सुंदर म्हण आहे—
“वृक्ष कबहुँ नहिं फल भखै, नदी न संचै नीर।
परमारथ के कारने, साधुन धरा शरीर।”
अर्थात, वृक्ष स्वतःची फळे स्वतः खात नाही आणि नदी आपले पाणी स्वतःसाठी साठवून ठेवत नाही. या दोन्हींचे अस्तित्व इतरांच्या कल्याणासाठी असते. आपल्या संत-महंतांनी आणि ऋषी-मुनींनी आपल्याला दीर्घकाळ हेच शिकवले आहे की, आपल्या आसपासच्या लोकांच्या कल्याणासाठी समर्पित केलेले जीवन हे केवळ वैयक्तिक यशापेक्षा कितीतरी मोठा अर्थ प्राप्त करून देते. एखाद्या व्यक्तीमध्ये ही भावना सातत्याने प्रतिबिंबित होत असेल, तर ते व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री अशोक सिंघलजी.
२७ सप्टेंबरपासून आपण त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात करत आहोत. आध्यात्मिक साधना, सांस्कृतिक जागृती आणि अनेक दशकांच्या समर्पित संघटनात्मक कार्याचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे स्मरण आणि गौरव करण्याचा हा प्रसंग आहे.
श्री अशोकजींसोबत असंख्य वेळा संवाद साधण्याची आणि त्यांचे प्रेम व आपुलकी अनुभवण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आमच्या संवादातील सुरुवातीच्या आठवणींपैकी एक आठवण १९८१ सालची आहे. त्यावेळी मी एक तरुण कार्यकर्ता म्हणून संघटनेने सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत होतो. त्याच काळात मला अशोकजींचे स्वतःच्या हस्ताक्षरातील एक पत्र मिळाले. माझ्यासाठी तो स्वाभाविकपणे अत्यंत महत्त्वाचा क्षण होता. त्यांनी एका महत्त्वाच्या आगामी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली होती आणि काही कामे करण्याची जबाबदारीही सोपवली होती.
अनेक दशकांमध्ये मी त्यांना रात्रंदिवस कार्यरत असताना पाहिले. ते अत्यंत दुर्गम आणि अनेकदा कठीण प्रदेशांमध्येही दीर्घ प्रवास करत असत. गुजरातमधील आदिवासी भागांमध्ये प्रवास करण्याची त्यांना विशेष आवड होती. समाजाच्या काठावर राहणाऱ्या आणि वंचित घटकांसाठी आणखी काय करता येईल, याचा विचार त्यांचे मन सतत करत असे.
हे ही वाचा:
कुराशमध्ये पिंकी बल्हाराला कांस्यपदक; उपांत्य फेरीत पराभव
एकही चेंडू न खेळता टीम इंडिया सेमीफायनलमध्ये!
काकांना आयुष्यभर जेलमध्ये टाकलंय…बेटा, आता तू तुझं आयुष्य जग!
इराणने होर्मुझमध्ये अमेरिकन पाण्याखालील ड्रोन पकडला
देशाच्या कोणत्याही भागात नैसर्गिक आपत्ती आली की, अशोकजी स्वतः तेथे पोहोचणाऱ्या पहिल्या व्यक्तींमध्ये असत किंवा पीडितांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये अग्रस्थानी असत. २००१ मध्ये कच्छमध्ये आलेल्या भूकंपानंतरच्या काळात त्यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव आजही अविस्मरणीय आहे.
इतरांबद्दलची ही करुणा आणि आपुलकीची भावना अशोकजींच्या जीवनात अगदी लहानपणापासूनच होती. त्यांचा जन्म अत्यंत प्रतिष्ठित आणि संपन्न कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील श्री महावीरजी हे एक नामांकित प्रशासकीय अधिकारी होते. त्यांचे एक बंधू श्री बी. पी. सिंघलजी पुढे पोलीस अधिकारी झाले आणि त्यानंतर खासदारही झाले. दुसरे बंधू श्री व्ही. पी. सिंघलजी हे त्रिपुरा राज्याची नुकतीच स्थापना झाल्यानंतर तेथील मुख्य सचिव होते. कुटुंबातील इतर सदस्यांनीही व्यापार आणि कृषी क्षेत्रात यश मिळवले.
मात्र, लहानपणापासूनच अशोकजींचे आकर्षण यापेक्षा वेगळ्या ध्येयाकडे होते—भारताच्या पुनरुत्थानाकडे आणि भारतमातेच्या संततीला गौरव प्राप्त करून देण्याकडे. प्रयागराजमध्ये वाढत असताना अशोकजी संगमाच्या तीरावर तासनतास बसत असत. नदीचे त्यांना स्वाभाविकपणे आकर्षण होतेच; पण तेथे येणारे संत, ऋषी-मुनी आणि भक्त यांच्याबद्दलही त्यांना तितकीच उत्सुकता होती. या वातावरणातून भारताच्या सांस्कृतिक जीवनपद्धतीची त्यांना सखोल जाण निर्माण झाली आणि समाजासाठी काहीतरी करण्याचा त्यांचा संकल्प अधिक दृढ झाला.
इतरांसाठी जगण्याची ही भावना त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे घेऊन गेली. त्यांच्यासमोर आलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी उत्साह, शिस्त आणि कर्तव्यभावनेने स्वीकारली. श्री अशोक सिंघलजींनी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रमांच्या माध्यमातून अनेक संस्था आणि चळवळींचे संवर्धन केले. त्यांना प्रभावी आणि दमदार आवाजाची देणगी लाभली होती. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाने संपूर्ण सभा मंत्रमुग्ध होत असे.
त्याचबरोबर सहकारी कार्यकर्त्यांबद्दलची त्यांची आपुलकीही विशेष उल्लेखनीय होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या विलक्षण साधेपणाचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नसे. संत समाजाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. देशभरातील संत आणि ऋषी-मुनींमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. ते अशोकजींच्या सल्ल्याला महत्त्व देत आणि त्यांचे म्हणणे अत्यंत आदरपूर्वक ऐकत. श्री अशोक सिंघलजींच्या व्यक्तिमत्त्वाची विलक्षण उंची अधोरेखित करणाऱ्या दोन घटना माझ्या मनात विशेषत्वाने येतात.
पहिली घटना १९९३ सालची. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे केलेल्या ऐतिहासिक भाषणाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेने अमेरिकेत एक अधिवेशन आयोजित केले होते. परदेशात अशा प्रकारची परिषद आयोजित करण्याची कल्पना, तिचे नियोजन आणि विविध क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणण्याचे काम यामध्ये अशोकजींच्या संघटनकौशल्याचे दर्शन घडले.
दुसरी घटना २००० सालची. त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील पोर्ट ऑफ स्पेन येथे जागतिक हिंदू परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे इतर प्रतिनिधींमध्ये निर्माण होणारा उत्साह मी प्रत्यक्ष पाहिला. माझ्या भाषणानंतर त्यांनी केलेले कौतुक माझ्यासाठी अत्यंत भावनिक अनुभव होता. एका कार्यकर्त्याला प्रोत्साहन दिल्यानंतर त्याच्यामध्ये किती ऊर्जा निर्माण होऊ शकते, याचा अनुभव मला पुन्हा एकदा आला.
श्री अशोक सिंघलजींचा उल्लेख रामजन्मभूमी आंदोलनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. १९९१ मध्ये दिल्लीतील बोट क्लबवरील सभेत त्यांनी केलेले भाषण कोण विसरू शकेल? किंवा रामजन्मभूमी आंदोलनाच्या शिखरकाळात जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेतील अशोकजींचे ते दृश्य कोण विसरेल? आज अयोध्येत भव्य राम मंदिर उभे आहे. हे शक्य करण्यासाठी स्वतःला निःस्वार्थपणे या प्रयत्नात झोकून देणाऱ्या अशोकजींसारख्या अनेक दिग्गजांचे योगदान आहे. अयोध्येत राम मंदिर आकार घेताना पाहून अशोकजी सर्वाधिक आनंदी झाले असते.
श्री अशोक सिंघलजींना विचारांची विलक्षण स्पष्टता लाभली होती. त्याचा प्रत्यय विशेषतः एका बाबतीत स्पष्टपणे येतो—आपला समाज सुसंवादी असला पाहिजे आणि बंधुभावाचा संदेश सातत्याने दृढ केला पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. सामाजिक ऐक्य आणि समानता मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले. समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू नये आणि प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा आणि सन्मान मिळायला हवा, असा त्यांचा दृढ विश्वास होता.
अयोध्येतील राम मंदिराची पहिली वीट श्री कामेश्वर चौपालजींच्या हस्ते ठेवली जावी, असा विचारही त्यांचाच होता. बिहारमधील तळागाळातील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असलेले कामेश्वर चौपाल हे समाजातील वंचित घटकातून आले होते. काशी येथे झालेल्या धर्मसंसदेत त्यांनी डोम राजाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांच्यासोबत कामही केले.
राष्ट्रनिर्माणाच्या कार्याव्यतिरिक्त श्री अशोक सिंघलजींच्या मनाच्या अतिशय जवळची आणखी दोन क्षेत्रे होती—शिक्षण, विशेषतः वैदिक शिक्षण आणि संगीत. वाराणसीचा खासदार म्हणून मला अभिमान वाटतो की, ज्या शाश्वत काशीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली, त्या काशीचा श्री अशोक सिंघलजींच्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध होता.
त्यांचे शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठात झाले आणि ते एक चांगले विद्यार्थी म्हणूनही ओळखले जात होते. दुर्गम गावांमध्ये, विशेषतः आदिवासी समुदायांमध्ये मूलभूत शिक्षण पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या एकल विद्यालय उपक्रमाशी त्यांचा जवळचा संबंध होता. ते अत्यंत वाचनप्रिय होते आणि चांगले श्रोतेही होते. तरुण कार्यकर्त्यांनी शक्य तितके अधिक वाचन करावे, असा सल्ला ते नेहमी देत असत.
अशोकजींना जवळून ओळखणाऱ्यांना त्यांच्या आणखी एका गुणाची चांगलीच माहिती होती—ते अतिशय सुंदर गात असत!
नागपूरमधील काही बैठकींची मला आठवण आहे. तेथे ते ‘एकल गीत’ गात असत. त्यांच्या गायनाने उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध होत आणि बैठकीचे वातावरणच भारावून जात असे. २०१५ मध्ये त्यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांनी ‘हे मातृभूमी मेरी, हे पितृभूमी मेरी’ हे गीत गाऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. आज श्री अशोक सिंघलजींच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत असताना, त्यांच्या महान कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची माहिती अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवूया.
तसेच, आपल्या राष्ट्रासाठी आणि समाजासाठी त्यांनी पाहिलेली स्वप्ने साकार करण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करूया.
