पूजा खेडकरचे पालक फरार: लूकआउट नोटीस जारी!

देश सोडून पळून गेल्याची शक्यता 

पूजा खेडकरचे पालक फरार: लूकआउट नोटीस जारी!

रबाळे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या रोड रेज आणि अपहरण प्रकरणात बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात लूकआउट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आले आहे. गेल्या नऊ दिवसांपासून अटक टाळत असलेल्या आरोपींविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

ही घटना १३ सप्टेंबर रोजी मुलुंड-ऐरोली लिंक रोड परिसरात घडली. दिलीप खेडकर यांच्या टोयोटा लँड क्रूझर SUV ला एका काँक्रीट मिक्सर ट्रकने धडक दिल्यानंतर, दोन्ही वाहनांतील प्रवाशांमध्ये वाद झाला. यानंतर, दिलीप खेडकर व त्यांच्या चालक प्रफुल्ल साळुंखे यांनी संबंधित ट्रक हेल्पर प्रल्हाद चौहान याचे अपहरण करून त्याला जबरदस्तीने पुण्यातील त्यांच्या बंगल्यात नेल्याचा आरोप आहे.

तपासात उघड झाले की, प्रल्हाद चौहान याला बंगल्यातील चौकीदाराच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते, त्याला शिळं अन्न दिलं जात होतं आणि नुकसान भरपाई न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली गेली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पुण्यातील खेडकरांच्या बंगल्यात छापा टाकून चौहान याची सुटका केली.

प्रकरणातील सहआरोपी आणि दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी पुण्यातील औंध येथील बंगल्यात पोलिसांना प्रवेश नाकारला, त्यामुळे रबाळे पोलीस ठाण्याचे API दीपक खरात यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

तसेच, सीसीटीव्ही फुटेज जाणूनबुजून नष्ट केल्याचा आरोपही मनोरमा यांच्यावर आहे. तिने DVR ठेवलेल्या बेडरूमची चावी एका अज्ञात व्यक्तीला दिली, त्यामुळे महत्त्वाचे व्हिडीओ फुटेज नष्ट होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणातील सहआरोपी प्रफुल्ल साळुंखे याला ६ दिवसांच्या शोधानंतर नाशिकजवळील धुळ्याच्या शिंदखेडा येथून अटक करण्यात आली आहे. मात्र, दिलीप आणि मनोरमा खेडकर अद्याप फरार आहेत. आरोपी देश सोडून पळून जाऊ नयेत म्हणून सर्व सीमारेषा आणि विमानतळांवर निगराणी वाढवण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

पाश्चात्य देशांनी भारताशी त्यांचे संबंध अधिक दृढ करा! फिनलंडचे अध्यक्ष असे का म्हणाले?

काँग्रेस पक्ष म्हणजे बुडणारे जहाज!

रेडलाईन मेट्रोत सिग्नल बिघाड; प्रवासी रागाने लालेलाल!

संयुक्त राष्ट्र महासभा: इंडोनेशियाच्या अध्यक्षांकडून भाषणाचा समारोप “ओम शांती, शांती ओम”ने

सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल धस यांनी सांगितले की, “हा प्रकार केवळ अपहरणापुरता मर्यादित नसून, त्यात शारीरिक, मानसिक छळ, फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न, आणि पोलिस कारवाईला अडथळा आणणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.”

रबाळे पोलिसांनी सुरुवातीला आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १३७(२) (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), १२७(७) (खंडणीसाठी चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि ३०८(४) (खंडणी) हे कलम जोडले गेले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version