घरविशेषगिलच्या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढली!

गिलच्या दुखापतीने टीम इंडियाची चिंता वाढली!

भारत-श्रीलंका कसोटी मालिकेला अजून काही दिवसांचा अवधी असतानाच टीम इंडियासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. कर्णधार शुभमन गिल याच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाला दुखापत झाल्याने तो श्रीलंका क्रिकेट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी मैदानात उतरू शकणार नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या तंबूत हलकीशी अस्वस्थता पसरली आहे.

कोलंबोतील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गिलच्या अनुपस्थितीत के.एल. राहुल याने भारतीय संघाचे नेतृत्व करत नाणेफेकीसाठी हजेरी लावली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सराव सत्रादरम्यान गिलच्या उजव्या हाताच्या अनामिकेला दुखापत झाली. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला सराव सामन्याच्या पहिल्या दिवसासाठी विश्रांती देण्यात आली असून वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

भारतासाठी हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण सध्याच्या कसोटी संघातील के.एल. राहुल आणि रवींद्र जाडेजा या दोघांनाच श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे उर्वरित खेळाडूंना स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरुवात होणार आहे. दुसरा कसोटी सामना २३ ऑगस्टपासून कोलंबोतील सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवला जाणार आहे.

अलीकडच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे ही मालिका भारतासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर असल्याने या मालिकेतील प्रत्येक विजयाला विशेष महत्त्व असणार आहे. आता सर्वांच्या नजरा शुभमन गिलच्या दुखापतीवर खिळल्या असून, ती गंभीर नसावी, अशीच भारतीय चाहत्यांची प्रार्थना आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version