सूर्यावर झालेल्या दोन शक्तिशाली उद्रेकांमुळे ११ ऑक्टोबरला पृथ्वीवर मध्यम स्वरूपाचे भूचुंबकीय वादळ (जिओमॅग्नेटीक स्टॉर्म) येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनाने (NOAA) यासंदर्भात इशारा दिला आहे. या सौर वादळामुळे काही उपग्रह, रेडिओ दळणवळण आणि नेव्हिगेशन यंत्रणांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, त्याचा प्रत्यक्ष परिणाम पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी सौर कणांचा कसा परस्परसंवाद होतो, यावर अवलंबून असेल.
NOAA ने संभाव्य भूचुंबकीय वादळासाठी ‘G2’ स्तराचा वॉच जारी केला आहे. या पाच स्तरांच्या वर्गीकरणात G1 हा किरकोळ, तर G5 हा अत्यंत तीव्र भूचुंबकीय वादळाचा स्तर आहे. त्यामुळे सध्याचा अंदाज मध्यम स्वरूपाच्या वादळाचा आहे. मात्र, सौर पदार्थ पृथ्वीच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याची तीव्रता अधिक स्पष्ट होईल.
सूर्यावर नेमके काय घडले?
सूर्याच्या पृष्ठभागावरून ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी दोन मोठे उद्रेक झाले. या उद्रेकांमधून विद्युतभारित कण आणि चुंबकीय पदार्थांचे प्रचंड ढग अवकाशात फेकले गेले. अशा घटनेला ‘कोरोनल मास इजेक्शन’ (CME) म्हणतात. दुसरा उद्रेक पहिल्यापेक्षा वेगाने प्रवास करत असून, पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापूर्वी हे दोन्ही प्रवाह एकत्र येण्याची शक्यता आहे. हे विद्युतभारित कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी परस्परसंवाद साधतात, तेव्हा भूचुंबकीय वादळ निर्माण होऊ शकते. या प्रक्रियेमुळे पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय वातावरणात बदल होतात. त्याचा परिणाम उपग्रहांच्या कार्यप्रणालीपासून रेडिओ सिग्नलपर्यंत विविध तंत्रज्ञानावर होऊ शकतो.
उपग्रह, रेडिओ आणि नेव्हिगेशनवर काय परिणाम होऊ शकतो?
भूचुंबकीय वादळाचा परिणाम प्रामुख्याने उच्च अक्षांशांवरील प्रदेशांमध्ये अधिक जाणवू शकतो. काही भागांत वीजपुरवठा यंत्रणांमध्ये व्होल्टेजमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता असते. उपग्रहांचे संचालन करणाऱ्या संस्थांना त्यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक ते बदल करावे लागू शकतात. काही भागांत रेडिओ सिग्नल कमकुवत होऊ शकतात, तर सॅटेलाइट नेव्हिगेशनच्या अचूकतेवरही तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे.
या सौर वादळाचा एक दृश्य परिणाम म्हणजे ‘ऑरोरा’ अर्थात ध्रुवीय प्रकाश. सूर्यापासून आलेले विद्युतभारित कण पृथ्वीच्या वातावरणातील वायूंशी परस्परसंवाद साधतात, तेव्हा आकाशात हिरव्या, लाल किंवा इतर रंगांच्या प्रकाशछटा दिसू शकतात. भूचुंबकीय वादळ अधिक तीव्र झाल्यास हा प्रकाश नेहमीपेक्षा कमी अक्षांशांवरील प्रदेशांतही दिसू शकतो.
हे ही वाचा:
कॉकरोचच्या आंदोलनापूर्वी ५० गुन्हेगारांसह ५०० जण ताब्यात
स्टारलिंकला परवानगी नाही, मस्क यांची अंबानींवर आगपाखड
दीपके, रांका, सौरव दासला पोलिसांनी विमानातच घेतले ताब्यात
आंदोलनापूर्वीच ध्रुव राठीला घरातून उचलले
भारताला धोका आहे का?
सध्याच्या G2 स्तराच्या अंदाजानुसार, भारतात दैनंदिन जीवनावर मोठा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. देशभर वीजपुरवठा खंडित होईल किंवा संपूर्ण दळणवळण यंत्रणा ठप्प होईल, असा इशारा देण्यात आलेला नाही. तसेच, भारतातून ध्रुवीय प्रकाश दिसेल, असेही सध्याच्या अंदाजावरून सांगता येत नाही. मात्र, सौर वादळाची तीव्रता आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी होणारा त्याचा परस्परसंवाद यावर अंतिम परिणाम अवलंबून असेल. त्यामुळे NOAA आणि इतर अवकाश हवामान संस्थांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
