घरविशेषफ्लायदुबई कटात सामील असल्यावरून मालदीवचे दोन वैमानिक ताब्यात

फ्लायदुबई कटात सामील असल्यावरून मालदीवचे दोन वैमानिक ताब्यात

ओमानी वैमानिकाच्या संपर्कात आल्याची माहिती

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई विमानाचे अपहरण करून ते पाडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणाच्या तपासादरम्यान संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) पोलिसांनी फ्लायदुबईमध्ये कार्यरत असलेल्या मालदीवच्या दोन वैमानिकांना अटक केली आहे. वृत्तांनुसार, ओमानचा सहवैमानिक विमानाचे अपहरण करण्याचा आणि ते पाडण्याचा कट रचत असल्याचा आरोप आहे. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेत कट रोखण्याचा प्रयत्न करताना भारतीय कॅप्टन स्मित मछार जखमी झाले होते.

मालदीवच्या वृत्तसंकेतस्थळ अधाधूने दिलेल्या वृत्तानुसार, या दोन्ही वैमानिकांना ३ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर यूएईतील मालदीवच्या दूतावासाने त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या ताब्यात असण्याची अधिकृत माहिती दिली. मालदीवच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. तसेच, यूएईच्या अधिकाऱ्यांनी या दोघांविरुद्ध नेमके कोणते आरोप आहेत किंवा या प्रकरणात त्यांची संभाव्य भूमिका काय आहे, याबाबत अधिकृत तपशील जाहीर केलेले नाहीत.

फ्लायदुबईचा सहवैमानिक हम्माम अल-हम्मामी याच्याशी संबंधित घटनेचा तपास यूएई प्रशासनाने अधिक व्यापक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. २९ वर्षीय ओमानी नागरिक असलेल्या अल-हम्मामीवर विमानाचा ताबा मिळवून कथित दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने भारतीय कॅप्टन स्मित मछार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे.

मालदीवची राजधानी माले येथून प्रसिद्ध होणाऱ्या मिहारू या वृत्तपत्रानुसार, या दोन्ही मालदीवच्या वैमानिकांचा अल-हम्मामीशी कामाच्या ठिकाणी संपर्क आला होता. तसेच, ते त्याच इमारतीत राहत असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, या दोघांचा कथित कटाशी नेमका काय संबंध होता किंवा त्यांच्याविरोधात कोणते पुरावे आहेत, याबाबत तपास यंत्रणांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

हे ही वाचा:

आंदोलनजीवींना घेरी येईल हे आकडे पाहून…

प्रक्षोभक पोस्ट, खोट्या बातम्यांप्रकरणी १०० सोशल मीडिया खाती बंद

चीनचा पुन्हा दावा, ‘संपूर्ण लडाख आमचा’

दिवाळीनंतर युपीआय व्यवहारांवर शुल्क

वृत्तसंकेतस्थळ एडिशन.एमव्हीच्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले दोघे हे फ्लायदुबईमध्ये वैमानिक म्हणून काम करणाऱ्या मालदीवच्या सहा नागरिकांपैकी आहेत. मालदीवमधून या विमान कंपनीत अलीकडेच भरती झालेल्या वैमानिकांमध्ये त्यांचा समावेश आहे.

फ्लायदुबईचे एफझेड १०७३ हे विमान दुबईहून तेल अवीवकडे जात होते. विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून १७४ जण होते. याच प्रवासादरम्यान सहवैमानिकाने विमानाचे अपहरण करून ते कोसळवण्याच्या कथित प्रयत्नात कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी असूनही कॅप्टन मच्छर यांनी हल्लेखोराचा प्रतिकार केला आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे इतर कर्मचारी आणि प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करून सहवैमानिकाला नियंत्रणात घेण्यास मदत झाली. त्यानंतर विमानाची परिस्थिती स्थिर करण्यात आली. या घटनेनंतर विमानाचे सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

यूएई प्रशासनाने या घटनेला दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न म्हटले असून, अल-हम्मामी हा कट्टरतावादी विचारसरणीला पाठिंबा देत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ओमानच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी त्याला वैमानिकाचा परवाना मिळवण्यास मनाई केली होती, असेही यूएई प्रशासनाने सांगितल्याचे वृत्त आहे. अशी निर्बंधात्मक पार्श्वभूमी असतानाही त्याची फ्लायदुबईमध्ये भरती कशी झाली, तसेच कथित कटामागील हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version